काय सांगता ! होय, निवृत्त पोलीस कर्मचार्‍याला रुग्णालयाकडून तब्बल 25 लाखांचे बिल

पोलिसनामा ऑनलाईन – मुंबईतील कोरोनाबाधित निवृत्त पोलीस कर्मचार्‍याला रुग्णालयाने 25 लाखांचे बिल दिल्याचा प्रकार समोर आला आहे. डोंगरी पोलीस ठाण्यात कर्तव्यास असणारे 58 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षक तुकाराम घुगे 31 मार्च रोजी निवृत्त झाले. त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वोक्हार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रुग्णालयाने त्यांना तब्बल 25 लाखांचे बिल आकारले आहे.

तुकाराम यांच्या मुलाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांना सर्दी आणि ताप आला होता. पण शेवटचे 10 दिवस कर्तव्य बजावण्याची इच्छा असल्याने त्यांनी सुट्टी टाकली नाही.स्थानिक डॉक्टराने तुकाराम यांची कोरोना चाचणी करण्याचा सल्ला दिला. मे महिन्यात कोरोना चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मुंबई सेंट्रलमध्ये पोलीस कॉलनीत राहत असल्याने वेगळ्या शौचालयाची सुविधा उपलब्ध नव्हती. यामुळे तुकाराम यांना रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. पण प्रकृती बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

दरम्यान, रुग्णालयाचे बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. तुकाराम यांच्या मुलाने सरकार आर्थिक मदत करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मित्र आणि नातेवाईकांनी आम्हाला खूप मदत केली आहे. आता आम्ही गृहविभाग आणि मुंबई पोलीस आयुक्तांकडे मदत मागितली असून ती मिळेल, अशी अपेक्षा त्यांच्या मुलाने व्यक्त केली आहे.