Coronavirus : राज्यातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 153 वर, एका दिवसात 28 नवीन रुग्ण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  –  राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून आज राज्यात आणखी 28 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 153 वर पोहचली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सांगलीमधील बाधित रुग्णांच्या संपर्कातील 15 व्यक्तींचा, तर नागपूरमधील 4 रुग्णाचा समावेश आहे. याव्यतिरीक्त प्रत्येकी 2 रुग्ण मुंबई आणि ठाणे येथील असून गोंदिया ,पालघर, कोल्हापूर आणि पुण्यात प्रत्येकी 1 रुग्ण आढळून आला आहे. तसेच गुजरात राज्यामध्ये 1 कोरोनाचा रुग्ण आढळून आला आहे.

आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात एका 85 वर्षीय डॉक्टरचा मृत्यू झाला. कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. मात्र, त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल अद्याप हाती आलेले नहीत. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडमधून परतले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता.
राज्यामध्ये 250 जण विविध रुग्णालयात भरती असून 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 3493 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यांपैकी 3059 जणांचे प्रयोगशाळेचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 153 जणांचे पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना बाधितांचा आकडा वाढत असला तरी आतापर्यंत 22 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. राज्यामध्ये सध्या 15 हजार 513 व्यक्ती घरगुती विलगीकरणात असून 1045 जण संस्थात्मक क्वॉरेंटाईनमध्ये आहेत.