Coronavirus : ‘या’ पोलीस ठाण्यात आढळले 32 ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, प्रचंड खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या ‘कोरोना योद्ध्यां’ना कोरोनाची लागण होत असल्याने चिंता वाढली आहे. राज्यात आतापर्यंत 1 हजार पेक्षा जास्त पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच सहार तथा मरोळ सारख्या अत्यंत दाटीवाटिच्या वस्त्या ज्या पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात येतात त्या सहार पोलीस ठाण्यातील 32 जण आतापर्यंत कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या पोलीस ठाण्यातील सर्वांची चाचणी करण्यात यावी अशी मागणी विलेपार्ले मतदारसंघाचे भाजप आमदार अ‍ॅड. पराग अवळणी यांनी एका पत्राद्वारे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याकडे केली आहे.

एकाच पोलीस ठाण्यात 32 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लागण होणे हे अतिशय गंभीर असून आपल्या योद्ध्यांची काळजी घेणे तसेच मोठ्या प्रमाणात विषाणूची लागण का होत आहे ? याबाबत विचार करावा लागेल. तसेच पुढील काळात या लढाईत पुरेसा स्टाफ उपलब्ध असावा या बाबत नियोजन करावे लागेल असे अळवणी यांनी पत्रात नमूद केले आहे. या पत्राची प्रत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पाठवली असल्याचे त्यांनी सांगितले.

या पोलीस ठाण्याच्या हद्दीत विमानतळ येत असून सद्या परदेशातून येत असलेल्या प्रवासी तसेच कार्गोमुळे येथे मोठ्या प्रमाणात लोकांचा वावर आहे. तसेच सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेला सहार व मरोळ पाईपलाईन सारख्या भागात सुमारे 80 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे सुद्धा तेथील कर्तव्य बजावणारे पोलीसकर्मी हाय रिस्क मध्ये येतात अशी माहिती त्यांनी दिली.