Coronavirus : कोणत्या वयोगटाला ‘कोरोना’चा सर्वाधिक धोका ? ‘सेरो’ सर्वेक्षणातून समोर आली महत्त्वाची माहिती

पोलिसनामा ऑनलाइन – सेरो सर्वेक्षणाच्या दुसऱ्या फेरीत 41 ते 60 वयोगटातील लोकांना कोरोना होण्याचा सर्वाधिक धोका असल्याचं आढळून आलं आहे. चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये सरासरी 45 टक्के व इमारतींमध्ये सुमारे 18 टक्के अँटीबॉडीज तयार झाल्याचंही समोर आलं आहे.

कोरोनाची लागण झाल्यानंतर रुग्णाच्या शरीरात नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती तयार होताना रक्तद्रव्यामध्ये (प्लाझ्मा) प्रतिद्रव्ये (अँटीबॉडीज) तयार होतात. ही प्रतिद्रव्ये या सर्वेक्षणात तपासली जातात. नीती आयोग, महापालिका, टाटा इंस्टिट्युट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई) यांच्याद्वारे संयुक्तरित्या सेरो सर्वेक्षण करण्यात येत आहे. आर मध्य-दहिसर-बोरीवली, एम पश्चिम-चेंबूर, एफ उत्तर (दादर, माटुंगा, वडाळा) या 3 विभागांमध्ये सर्वेक्षण करण्यात येत आहे.

झोपडपट्टीतील 3022 तर बिगर झोपडपट्टी परिसरातील 2174 नागरिकांची तपासणी करण्यात आली. 41 ते 60 वयोगटातील लोक कामानिमित्त, प्रभातफेरी आणि मित्रांच्या भेटीगाठी साठी जाण्याचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळं या वयोगटातील लोकांना कोरोना होण्याचा धोका अधिक असतो. 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळं ते सुरक्षित असल्याचं दिसून आलं आहे.

पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण किंचित जास्त

झोपडपट्ट्यांमध्ये 41 ते 60 वयोगटात बाधित रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण 50.3 टक्के आहे. तर इमारतींमध्ये या वयोगटातील बाधित रुग्णांचे प्रमाण 18.6 टक्के एवढे होते. 60 वर्षांवरील लोकांमध्ये 48.2 टक्के, 25 ते 40 दरम्यान 42.2 टक्के, 12 ते 24 वर्षे वयोगटात 40.8 टक्के बाधित आढळून आले. इमारतींमध्ये 12 ते 24 वयोगटात 18.5 टक्के, 25 ते 40 मध्ये 16.6 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये बाधित रुग्णांचे प्रमाण 13.2 टक्के आहे.

सर्वेक्षणाच्या दोन्ही फेऱ्यांमध्ये अँटीबॉडीज प्राबल्य हे पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये किंचितसे अधिक आढळून आले. बरे झालेले रुग्ण, लक्षणं नसलेले रुग्ण यांच्यात काही कालावधीनंतर अँटीबॉडीज पातळीत घट दिसून आली. ही बाब दोन्ही फेऱ्यांमधील सर्वेक्षणादरम्यान कल दर्शवते.