Coronavirus : दिलासादायक ! पुणे शहर पोलिस दलातील 426 जण ‘कोरोना’मुक्त, निम्म्यापेक्षा अधिक कामावर रूजू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनाच्या महामारीत 24 तास काम करणाऱ्या पुणे शहर पोलिस दलातील तबल 561 अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 426 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यापैकी 50 टक्क्याहून अधिक पोलीस पुन्हा कामावर हजर झाले आहेत. दुर्दैवाने आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक कोरोना असणारे मुंबईनंतर पुणे शहर आहे. त्याचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासन व पोलिस दल काम करत आहे रस्त्यावर उतरून काम करताना पोलिसांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला. काम करताना सर्व प्रकारची काळजी घेतली जात होती. तरीही नागरिकांशी संपर्क आल्याने काही पोलिसांना कोरोनाची लागण झाली.

प्रथम एका मध्यवस्तीमधील पोलिस ठाण्याचे कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली. त्या ठिकाणी आणखी काही कोरोना पॉझिटीव्ह कर्मचारी सापडले होते. नंतर पोलिस ठाणे अधिकारी व कर्मचारी क्वारंटाईन केले होते.शहरात आतापर्यंत 561 पोलिसांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 426 पोलीस ठणठणीत बरे झाले आहेत. कोरोना संसर्ग झालेले पोलिस व त्यांच्या कुटुंबिसाठी स्वतंत्र हॉस्पिटल राखीव ठेवले होते. तसेच, त्यांना उपचार मिळतात का हे पाहण्यासाठी एका सहायक आयुक्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली होती.

आता शहरातील १३२ पोलिस विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर, ४५ जण होम क्वारंटाइन करण्यात आले आहेत. राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण असलेल्या पहिल्या पाच शहरात पुण्याचा क्रमांक लागतो. इतर शहराच्या तुलनेत पुण्यातील पोलिसांना कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आहे. पोलिस दलाकडून घेतली जाणारी काळजी, प्रतिबंधात्मक उपाययोजना, रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी देण्यात आलेली औषधांचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.