मुंबईला कोरोनाचा ‘धोका’ कायम, राज्यात रुग्णांच्या संख्येने ओलांडला 4666 चा टप्पा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. देशात महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात मुंबई आणि पुण्यामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले असून मुंबईचा धोका कायम आहे. गेल्या 12 तासांमध्ये 466 नवी रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 4666 एवढी झाली आहे.

तर मृत्यूचा आकडा 232 वर गेला आहे. आज 65 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 572 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोना चाचणीची संख्या 76 हजार 92 एवढी झाली आहे. त्यापैकी 76 हजार 611 चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या 81 टक्के रुग्णांना कुठलीही लक्षणं आढळलेली नाहीत. म्हणजेच लक्षणं दिसत नसली तरी कोरोना असू शकतो असे आता स्पष्ट झाले आहे.

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईतील धारावी सारख्या भागात कोरोनाने शिरकाव केल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. धारावीत 30 नवे रुग्ण आढळल्याने धारावीतल्या एकूण रुग्णांची संख्या 168 वर गेली आहे. सगळ्यात जास्त रुग्ण 5 शास्त्रीनगरमध्ये तर 8 रुग्णांचा पत्ता शोधून काढण्याचे काम सुरु आहे. आज एकाही नव्या मृत्यूची नोंद नाही. धारावीतील मृतांचा आकडा 11 झाला आहे.