Coronavirus : देशात ‘कोरोना’चा हाहाकार ! 24 तासात 472 नवीन रूग्ण, 274 जिल्हयांना ‘विळखा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 24 तासात 472 नवीन रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे. मंत्रालयातले सचिव लव अग्रवाल यांनी ही माहिती दिली. रुग्णांची एकूण संख्या 3774 झाली आहे. आत्तापर्यंत 79 मृत्यू झाले असून गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 167 जण या आजारातून बरे झाले आहेत. तर देशातल्या 274 जिल्ह्यांमध्ये कोरोना पसरल्याची माहिती अग्रवाल यांनी दिली.

लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग हे सर्वात मोठं सामाजिक औषध आहे. सरकार आणि तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांचं पालन जेव्हा काटेकोरपणे केलं जाईल तेवढ्या प्रमाणात कोरोनाला रोखण्यात यश मिळेल असेही अग्रवाल यांनी म्हटलं आहे.

भारतामध्ये 30 जानेवारी रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये आढळून आला होता. त्यानंतर आता तब्बल कोरोनाची संख्या तिपटीने वाढली आहे. सुरुवातीला केवळ विदेशातून परतलेल्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, आता हळुहळु क्लस्टर आउटब्रेक आणि संपर्कातून संक्रमण होण्यास सुरुवात झाली आहे. भारताच्या लोकसंखेच्या तुलनेने रुग्णांचा आकडा कमी दिसत असला तरी, त्यात होणारी वाढ ही भारतासाठी धोकादायक आहे. भारतामध्ये कोरोनाचा दुसरा टप्पा सुरु आहे.

भारतात कोरोनाच्या रुग्णांची वाढ ही महिन्याभरात सर्वाधिक झाली आहे. 30 जानेवारी ते 2 मार्च या कालावधीत केवळ 5 कोरोनाचे रुग्ण होते. मात्र पुढच्या 8 दिवसांत ही संख्या 50 झाली. तर एका महिन्यात ही संख्या 2500 पर्यंत पोहचली. त्यामुळे 2 मार्च ते 2 एप्रिल या 30 दिवसात भारतात तब्बल 2495 रुग्णांची वाढ झाली आहे.