Coronavirus : सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणार्‍यांना 500 तर थुंकणाऱ्यांना 1 हजार दंड; महापालिकेकडून नवीन मार्गदर्शक सूचना जारी

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोनाच्या रुग्ण संख्येत वेगाने वाढ होत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली झाली. शहरात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी सुधारीत आदेश जारी केले आहेत. नव्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या व्यक्तीला 500 रुपये तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंड आकारण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुधारीत नियम

1. कोविड-19 च्या व्यवस्थापनाबाबतचे राष्ट्रीय निर्देश

– सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी तसेच प्रवास करताना मास्क वापरणे अनिवार्य आहे. मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तीवर 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– सार्वजनिक ठिकाणी सर्व व्यक्तींनी किमान सहा फुटांचे सामाजिक अंतर ठेवले पाहिजे. दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये सामाजीक अंतर राखण्याची जबाबदारी संबंधित दुकानदारांची राहील. तसेच दुकानदाराने दुकानामध्ये एका वेळेस पाच पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश देऊ नये.
– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीकडून 1 हजार रुपये दंड आकारण्यात येईल.
– सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, धुम्रपान व मद्यपान करण्यास सक्त मनाई आहे.

2. कामाच्या ठिकाणाचे निर्देश

– जो पर्यंत घरातून काम करणे शक्य असेल तोपर्यंत घरातून काम करण्याची पद्धत अवलंबण्यात यावी. कार्यालये, कामाचे ठिकाण, दुकान, बाजारपेठ आणि औद्योगिक व वाणिज्यिक आस्थापना यामध्ये कामाच्या/कामकाजाच्या वेळांचे नियोजन करावे.
– थर्मल स्क्रीनिंग, हँड वॉश व सॅनिटायझर हे सर्व प्रवेशद्वाराजवळ ठेवावेत.
– कामाच्या ठिकाणी वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे. व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या सर्व जागा उदा. डोअर हॅन्डल यांचे वारंवार निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
– कामाच्या ठिकाणी सर्व प्रभारी व्यक्ती, कामागारांमध्ये सामाजिक अंतर असावे. कामाच्या शिफ्टमध्ये पर्याप्त अंतर ठेवावे. दुपारच्या जेवणाच्या वेळेत पुरेसे अंतर राखणे.

3. कटेनमेंट झोन

– कंटेनमेंट झोन बाबत राज्य शासनाकडून दिलेल्या आदेशांतील अटी व शर्तींचे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील.
– कंटेनमेंट झोन जाहीर करणे व त्या ठिकाणी राबवण्यात येणाऱ्या उपाय योजना करिता केंद्र सरकार व राज्य सरकारने वेळोवेळी निर्गमित केलेले आदेश/निर्देश यापुढे कायम राहतील.
– पिंपरी चिंचवड महापालिकेने निर्गमित केलेले आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे.

4. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात 28 मार्च 2021 च्या रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीला प्रत्येकी 1000 रुपये दंड केला जाईल.

5. सार्वजनिक ठिकाणे रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद राहतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर 1000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

6. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील सर्व दुकाने (अत्यावश्यक वस्तू व सेवा वगळून) हॉटेल, रेस्टॉरंट, बार फूडकोर्ट, सिनेमागृह, नाट्यगृह, प्रेक्षागृह इत्यादी आस्तापना रात्री 8 ते सकाळी 7 यावेळेत बंद राहतील. मात्र, हॉटेलमधून पार्सल सेवा, घरपोच सेवा सुरु राहिल. या निमयांचे उल्लंघन करणाऱ्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल.

7. पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात सर्व प्रकारचे सामाजिक, राजकिय, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा संमेलने यांना बंदी राहील. त्याच प्रमाणे भूमी पूजन, उद्घाटन समारंभ यासारख्या कार्य़क्रमांना देखील बंदी असेल.

8. लग्न समारंभात केवळ 50 लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी असले.

9. अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी संबंधित कार्यक्रम जास्तीत जास्त 20 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी असेल.

10. पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील सर्व उद्याने पूर्णपणे बंद राहतील.

11. होम क्वारंटाईनसाठी मार्गदर्शक सुचना

– सहाय्यक आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, झोन अधिकारी यांना होम क्वारंटाइन बाबत नागरिकांनी माहिती देणे बंधनकारक आहे. तसेच होम क्वारंटाईनमध्ये असताना घेण्यात येणाऱ्या वैद्यकिय उपचारांबाबत संबंधित क्षेत्रिय कार्यालय यांना माहिती देणे गरजचे आहे.
– सहाय्यक आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, झोन अधिकारी यांनी कोविड पॉझिटिव्ह रुग्ण झाल्यापासून 14 दिवसांचा विलगीकरण कालावधी दर्शवणारा फलक दरवाजावर किंवा दर्शनी भागावर लावावा.
– कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या हातावर शिक्का मारण्याची कार्यवाही सहाय्यक आयुक्त, क्षेत्रिय अधिकारी, झोन अधिकारी यांनी करावी.
– कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरातील व्यक्तींनी शक्यतो घराबाहेर पडू नये. आवश्यक असल्यास मास्क घालून घराबाहेर पडावे.

12. सर्व खासगी कार्यालये (वैद्यकिय, आरोग्य व अत्यावश्यक सेवा वगळून) 50 टक्के मनुष्यबळासह सुरु ठेवावीत. मात्र कोविड संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे. उत्पादन क्षेत्र संपूर्ण क्षमतेने सुरु ठेवता येतील. मात्र कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. संबंधित आस्थापनांनी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये कामाचे नियोजन करावे.

13. शासकीय कार्यालयात गर्दी टाळण्यासाटी सर्व शासकीय कार्यालयात नागरिकांना अत्यावश्यक काम वगळता कार्यालयात येण्यास प्रतिबंद करण्यात येत आहे. मात्र, बैठकी करता निमंत्रित करण्यात आलेल्या नागरिकांना संबंधित विभाग, कार्यलय प्रमुखांनी प्रवेशाचे पत्र द्यावे.

14. सर्व धार्मिक स्थळांच्या ठिकाणी सामाजिक अंतर तसेच तेथील जागेची उपलब्धता पाहून नागरिकांना प्रवेश द्यावा. याची जबाबदारी व्यवस्थापन, ट्रस्ट यांची असले. ऑनलाईन पासची व्यवस्था करावी.

15. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था (PMPML) 50 टक्के क्षमतेने सुरु राहील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल.