Coronavirus : धक्कादायक ! राज्यात 2 दिवसात 6 पोलिसांचा ‘कोरोना’मुळे मृत्यु

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोलापूर येथील एम आय डीसी पोलीस ठाण्यात नेमणूकीस असलेले पोलीस नाईक यांचा शुक्रवारी सकाळी कोरोनामुळे मृत्यु झाला. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात राज्यात ६ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे.

मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यातील ५५ वर्षीय पोलीस हवालदार यांचा कोरोनामुळे गुरुवारी मृत्यु झाला. त्याचवेळी पुण्यातील समर्थ वाहतूक शाखेत कार्यरत असलेले व गेले काही दिवस कोरोनाची लागण झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांचा मृत्यु झाला होता.

ठाण्यातील श्रीनगर पोलीस ठाण्यातील ४५ वर्षाच्या महिला पोलीस कर्मचारी यांचा गुरुवारी रात्री खासगी रुग्णालयात कोरोनाशी लढता मृत्यु झाला. ठाणे शहरातील पोलीस दलातील ही पहिलीच घटना आहे.
दहशतवाद विरोधी पथक नागपाडा युनिटचे पोलीस हेड कॉन्सटेबल यांचा मृत्यु झाला होता. त्यांची मरणोत्तर कोरोना चाचणी केली. त्याचा अहवाल गुरुवारी आला होता. त्यात ते कोरोना पॉसिटिव्ह आढळून आले होते. राज्यभरातील १३८८ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून आतापर्यंत २० पोलिसांना बळी गेला आहे.