Coronavirus : पुण्यातील कोंढवा-येवलेवाडीमधील कोविड सेंटरमध्ये 60 वर्षीय ज्येष्ठाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे – पोलीसनामा ऑनलाइन  – पुणे महापालिकेच्या कोंढवा येवलेवाडी येथील कोविड सेन्टर मध्ये एका 60 वर्षीय रुग्णाने बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. कोरोना झाल्याने 60 वर्षीय रुग्ण आणि त्यांचा 27 वर्षीय मुलगा उपचारासाठी येथे दाखल झाला होता. दोघेही बापलेक एकाच रूममध्ये राहात होते.

मुलगा नाश्ता आणण्यासाठी गेला, त्यावेळी 60 वर्षीय रूग्णाने बाथरूम मध्ये गळफास घेतला. मुलगा परत आल्यानंतर वडील बाथरूमचा दरवाजा उघडत नाहीत आणि प्रतिसादही देत नाहीत असे लक्षात आल्याने त्याने कर्मचाऱ्यांना बोलवले. अखेर पोलिसांना पाचारण करण्यात आले. दरवाजा तोडून पाहिल्यावर 60 वर्षीय रूग्णाने गळफास घेतल्याचे समोर आले.

याप्रकरणी पोलीस पंचनामा करत असून चौकशी नंतर घटनेचा तपशील समोर येईल. महापालिकेचे उपायुक्त सुरेश जगताप यांनी या घटनेला दुजोरा दिला असून पोलीस तापसानंतर अधिक तपशील समोर येईल, असे सांगितले.