Coronavirus Lockdown : 60 वर्षाच्या बापानं आजारी मुलीला खांद्यावर घेतलं, केला तब्बल 26 किमी पायी प्रवास

मुंबई, पोलिसनामा ऑनलाईन – लॉकडाऊन मुळे सध्या अनेकांचे हाल होताना दिसत आहेत . गरीब, सर्वसामान्य माणूस या परिस्थितीतून होरपळून निघतो आहे. गोवंडी मधील झोपडपट्टीत राहणाऱ्या ६० वर्षीय मोहंमद रफी यांची मुलगी आजारी असल्याने तिला दवाखान्यात नेण्यासाठी २६ किलोमीटरची पायपीट केली. लॉकडाऊन मुळे वाहतूक व्यवस्था तर बंद आहेच शिवाय अनेकांच्या हाताला काम देखील नाही. मोहंमद रफी हे कूकचे काम करतात .परंतु या लॉकडाऊन मुळे त्यांच्या हाताला काम नाही आणि जवळ पुरेसे पैसे देखील नाहीत. त्यामुळे मोहंमद यांच्याकडे जीवनावश्यक गोष्टींचा मोठा तुटवडा आहे. गुरुवारी अचानक मोहमद यांच्या मुलीच्या पोटात दुखू लागले त्यामुळे ति अत्यवस्थ झाली होती .

मुलीच्या वेदना पाहून ६० वर्षीय मोहंमद यांनी आपल्या १७ वर्षाच्या मुलीला खांद्यावर घेत भरउन्हातुन २६ किलोमीटरची पायी पायपीट केली. मोहमद हे ज्यावेळी मुंबईच्या केईएम रुग्णालयात पोहचले त्यावेळी त्यांचे संपूर्ण अंग हे कापत होते. त्यावेळी त्यांनी मुलीवर उपचार करायचे आहे पण पैसे नाहीत असे सांगितले. उपचार करून झाल्यावर मोहंमद हे पुन्हा मुलीला खांद्यावर बसवून २६ किलोमीटर पायी प्रवास करत गेले. लॉकडाऊन मुळे अनेक गरीब कुटुंबांची दयनीय अवस्था होताना दिसत आहे. याचा जबरदस्त फटका हा सर्वसामान्य माणसांना बसतो आहे.