Coronavirus : पुण्यात 74 ‘फ्ल्यू सेंटर’, पुणे पोलिसांनी केलं ‘हे’ आवाहन (व्हिडीओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने कोरोना फ्ल्यू सेंटर सुरु करण्यात आली आहे. यामध्ये पालिकेने वाढ केली असून पुणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 74 फ्ल्यू सेंटर्स सुरु केले आहेत. तसेच 11 मोबाइल चेकअप व्हॅनची सोय करण्यात आली आहे. फ्ल्यू सारखी लक्षणं आढळून आल्यास नागरिकांनी महापालिकेच्या फ्ल्यू सेंटरमध्ये उपचार घ्यावेत असे आवाहन पुणे पोलिसांनी पुणे शहरातील नागरिकांना केले आहे.

ज्या नागरिकांमध्ये फ्ल्यू सारखी (सर्दी, खोकला, ताप) लक्षणं दिसून येत असतील, विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि ज्या व्यक्तींना रक्तदाब, मधुमेह, अस्थमा, हृदयरोग यासारखे आजार असतील अशा नागरिकांनी तात्काळ फ्ल्यू सेंटर किंवा मोबाइल चेकअप व्हॅनला भेट देऊन उपचार घ्यावेत.

तसेच खासगी डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णामध्ये फ्ल्यूची लक्षणं दिसून आल्यास त्याला पुणे महापालिकेच्या फ्ल्यू सेंटरमध्ये किंवा कोविड केअर सेंटरमध्ये नायडू रुग्णालय, वायसीएम रुग्णालय, ससून जनरल हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, औंध येथे पाठवावे.  या सेंटर्सवर रुग्णाकडून कोवीड -19 च्या चाचणीसाठीचे नमुने गोळा केले जातील आणि गरज भासल्यास चाचणीच्या रिपोर्टनुसार उपचार केले जातील.

नागरिकांसाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक

राष्ट्रीय हेल्पलाईन  – 011-23978046
नियंत्रण कक्ष, पुणे – 020 – 26127394

आपत्ती व्यवस्थापन केंद्र, पुणे

020-25506800, 020 – 25506801, 020 – 25506802, 020 – 25506803, 020- 25501269

कोविड – 19 हेल्पलाईन – 104, पोलीस – 100, रुग्णवाहिका – 108

 जिल्हा नियंत्रण कक्ष – 1800 233 4130