Coronavirus : अरे देवा ! ‘कोरोना’मुळं 9 महिन्याच्या बाळाचा मृत्यू, मृतदेह सोडून निर्दयी आई-वडिल पळाले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील ६२ लाख लोकांना कोरोना संसर्गाची लागण झाली आहे. तर साडेतीन लाखांच्यावरती लोकांचा मृत्यू देखील या संसर्गाने झाला असून, २९ लाखांच्या आसपास लोक उपचारानंतर बरे झाले आहेत. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी जगातील बऱ्याच देशांनी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे. मात्र, तरीही नागरिकांना कोरोना संसर्गाच्या दहशतीखाली जगावं लागत असल्याचं चित्र सगळीकडे दिसत आहे.

कोरोना संसर्गाच्या सध्याच्या या काळात नात्यांचीही परीक्षा पहावयास मिळत आहे. या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूची दहशत एवढी मोठी आहे की, आई-वडिलांनी आपल्या चिमुकल्या मुलास आपल्या पासून दूर केलं आहे. रामपूर येथील मिलक परिसरात उपचारादरम्यान ९ महिन्यांच्या चिमुकल्याने अखेरचा श्वास घेतला. या मुलाचा कोरोना संसर्ग अहवाल पॉझिटिव्ह आला होता. परंतु, ज्यावेळेस याची माहिती आई-वडिलांना मिळाली तेव्हा त्यांनी या चिमुकल्याला रुग्णालयातच सोडून दिलं. दरम्यान, मृतदेह घेण्यासाठी अधिकाऱ्यांनी संपर्क साधला असता, मृतदेह स्वीकारण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला. त्यानंतर एम्स प्रशासनाने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले.

सदरील ९ महिन्यांच्या या चिमुकल्याच्या डोक्याला गाठ होती, त्याच्यावरती एम्समध्ये उपचार सुरु होते. डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं होत. लॉकडाऊन असल्याच्या कारणामुळे उपचारासाठी दिल्लीला जाता येत नव्हते. परंतु, रामपूर येथिल एका नर्सिंग होमने मुलास दिल्लीला घेऊन जाण्याची सूचना केली. त्यानंतर या मुलाला आई-वडिलांनी एम्समध्ये दाखल केले. रुग्णालयाने ऑपरेशन पूर्वी केलेल्या तपासणीमध्ये २९ मे रोजी आई-वडिलांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. पण मुलगा कोरोना संसर्गित असल्याची माहिती मिळताच आई-वडिलांनी तेथून धूम ठोकली.

याबाबत एम्स प्रशासनाने रामपूर जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. त्यानंतर या चिमुकल्याचे आई-वडील गावातच असल्याची माहिती मिळाली. त्याच्या वडिलांनी लिहून दिलं की, माझ्या मुलावरती रुग्णालयं प्रशासनाने अंत्यसंस्कार करावे. त्यानंतर या चिमुकल्याचा मृतदेहावर एम्स रुग्णालय प्रशासनाकडून अंत्यसंस्कार करण्यात आलं.