Coronavirus : आणखी 9 पोलिसांना ‘कोरोना’ची लागण, राज्यातील संख्या 49 वर

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स आणि पोलीस सगळ्या आघाडीवर लढत आहेत. डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवत आहेत. तर पोलीस नागरिकांचे संरक्षण करत आहे. मात्र, लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांचा बंदोबस्त पोलिसांना करावा लागतोय. त्यामुळे सर्वाधित ताण पोलीसांवर आहे. 24 तास ड्युटीवर राहणाऱ्या पोलिसांना देखील आता कोरोनाची लगण होत आहे. मागील 12 तासात 9 पोलिसांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांची संख्या 49 वर पोहचली आहे. यामध्ये 11 अधिकारी आणि 38 जवानांचा समावेश आहे.

कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने याआधी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यानंतर लॉकडाऊन दरम्यान कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना कोरोनाची लागण झाली. आता फिल्डवरून बातमी देणाऱ्या पत्रकारांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत तब्बल 53 पत्रकरांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे शासकिय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर तैनात सहायक पोलीस निरीक्षकाला कोरोना सदृष्य लक्षण दिसून आली. त्याची कोरोनाची चाचणी करण्यात आली असून अद्याप याचा अहवाल मिळालेला नाही. मात्र, या पोलीस अधिकाऱ्याल घरीच क्वारंटाइनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे. तर त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरच राहणं पसंत केलं आहे. ते वर्षा बंगल्यावर फक्त शासकिय बैठका आणि भेटीगाठीच घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी फक्त मोजक्याच बैठका वर्षा बंगल्यावर घेतल्या होत्या. राजभवन, सह्याद्री गेस्ट हाऊस, मंत्रालय आणि इतर महत्त्वाच्या सर्व कार्यालयांमध्ये असलेल्या कर्मचाऱ्यांनाही काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सॅनिटायजेशनचे काम सुरु करण्यात आले आहे.