Coronavirus : पिंपरी-चिंचवडमध्ये दीड महिन्याच्या बालिकेसह 9 नवे रूग्ण

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी-चिंचवड शहरात मंगळवारी (दि.५) कोरोनाबाधित तब्बल ९ रूग्ण आढळले. त्यात दीड महिन्यांची बालिका, ४ व ११ वर्षाचे बालक ते ७५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या १४२ वर पोहोचली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या दुपारपर्यंतच्या अहवालावरून ही बाब स्पष्ट झाली आहे. तळवडे, रूपीनगर, संभाजीनगर, सांगवी या परिसरातील ८ रूग्ण आहेत. त्यात ४, ११, २२, ३९,६१, ७४ वर्षांचे पुरूष व दीड महिन्यांची बालिका व ३७ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर, पुण्यातील शिवाजीनगर परिसरातील ७५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.
पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात ६३ जणांवर उपचार सुरू असून, त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. तर, ११ जण पुण्यातील विविध रूग्णालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत एकूण ५५ जण कोरोनातून मुक्त झाले आहेत. तर, ५ जणांचा मृत्यू झाला आहे