धक्कादायक ! ‘कोरोना’मुळे आतापर्यंत देशात 99 डॉक्टरांचा मृत्यू, मृत्यूदर 10 टक्क्यांवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशासह राज्यातील कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. सध्या देशात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा नऊ लाखांच्या पुढे गेला असून यात अधीक्षक प्रमाणात डॉक्टर कोरोनाचे शिकार होत आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे देशात इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्या ९९ डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर, १ हजार ३०९ डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात पीपीई किटच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत.

देशाचा मृत्यूदर पाच टक्के असताना आयएमएच्या डॉक्टरांचा मृत्यूदर १० टक्के आहे, यावर आयएमएने चिंता व्यक्त केली आहे. तर आता आपल्या सर्व डॉक्टरांसाठी ‘रेड अलर्ट’ जारी करून स्वतःची काळजी घेण्यास सांगितले आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माहितीनुसार, मार्चपासून जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत १ हजार ३०२ डॉक्टरांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे.

यात ५८६ प्रॅक्टिशनर डॉक्टर, ५६६ निवासी डॉक्टर, १00 हाऊस सर्जन आहेत. तर यातील ९९ डॉक्टरांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक ७३ मृत्यू हे ५० वर्षांहून अधिक वय असणाऱ्या डॉक्टरांचे झाले आहेत. ही टक्केवारी ७५ टक्के इतकी आहे. तर ३५ वर्षापर्यंत सात तर ३५ ते ५0 वयोगटातील १९ डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे डॉक्टरांचे झालेले मृत्यू शंभराच्या टप्प्यावर आहेत, त्यामुळे डॉक्टरांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. त्यात आता इंडियन मेडिकल असोसिएशनने रेड अलर्ट जारी करून डॉक्टरांना स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहनकेले आहे, अशी माहिती आयएमए सदस्य आणि महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे.

डॉक्टर योग्य ती खबरदारी घेत असले तरीही अनेक डॉक्टर कोरोनाचा संसर्ग होत आहेत, काहींचा यात मृत्यू होत आहे. त्यामुळे पीपीई किटच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. त्यामुळे आता सरकारने पीपीई किटच्या दर्जावर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणीही डॉ. उत्तुरे यांनी केली आहे..

कोरोनाबाधित डॉक्टर १ हजार ३०२
मृत्यू ९९

वयोगटनिहाय मृत्यू मृतांचा आकडा
३५ वर्षांहून कमी ७
३५ ते ५० १९
५० वर्षांहून अधिक ७३
एकूण ९९

बाधितांची संख्या
प्रॅक्टिसिंग डॉक्टर ५८६
निवासी डॉक्टर ५६६
हाऊस सर्जन १५०
एकूण १३०२