Coronavirus : इंदापुर तालुक्यातील 45 वर्षीय डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू; आतापर्यंत तालुक्यातील 353 जणांचा बळी

पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या काही दिवसांपासून इंदापूर तालुक्यात लॉकडाऊनमुळे कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. त्यामुळे दिलासा मिळाला आहे. परंतु रुग्णसेवा बजावणा-या डॉक्टरालाच जीव गमवावा लागत असल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंथुर्णे येथील एका डॉक्टराचा कोरोनावर उपचार सुरु असताना शनिवारी (दि. 22) दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे

डॉ मधुकर रामचंद्र धापटे (वय 45 रा. अंथुर्णे) असे मृत्यू झालेल्या डॉक्टराचे नाव आहे. एप्रिल महिन्यात डॉ. धापटे यांना कोरोनाची लागण झाली. त्यांना बारामतीत खासगी दवाखान्यात दाखल केले होते. मात्र उपचाराचा काही फरक पडत नसल्याने त्यांना पुण्यात खासगी दवाखान्यात दाखल केले. काही दिवस तिथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र एक महिन्यानंतरही तब्बेतीत सुधारणा झाली नाही. अखेर शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. तालुक्यातील अंथुर्णे येथे असणाऱ्या रुग्णालयात ते कार्यरत होते. आतापर्यंत तालुक्यात 353 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान इंदापूर तालुक्यात रविवारी अखेर ग्रामीण भागात 13 हजार 262 तर शहरी भागात 2 हजार 222 कोरोनाबाधित आढळले आहेत. त्यापैकी 353 रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. तर 13 हजार 664 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.