Coronavirus : धक्कादायक ! ‘कोरोना’च्या भीतीने सरकारी कर्मचाऱ्याची कार्यालयातच आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढतोच आहे. देशातील नागरिकांसह अवघ्या जगाने याचा धसका घेतला आहे. हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे प्रत्येकालाच आपल्या कुटुंबीयांची आणि स्वतःच्या आरोग्याची काळजी आहे. या आजाराची भयानकता पाहून एका सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ पोलीस अधीक्षक दिनेश कुमार यांनी ए. एन .आय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील नकूर पोलिस स्टेशन हद्दीतील ही घटना आहे. एका सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या कार्यालयातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती दिनेश कुमार यांनी दिली आहे. या व्यतीच्या जवळ एक सुसाईड नोट सुद्धा आढळून आली असून यात या व्यक्तीने त्याला कोरोनाव्हायरसची भीती वाटत असल्याचे नमूद केले आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की गेल्या काही दिवसांपासून ते डिप्रेशन मध्ये होते.

या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली असून , याबाबतचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप बघता सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या गंभीर परिस्थितीशी लढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला आहे. पण अशा परिस्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून पोलीस, स्वच्छता दूत, आरोग्य सेवेतील कर्मचारी तसेच काही सरकारी कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत.