Coronavirus : मोठा दिलासा ! राज्यातील सुमारे 94 % ‘कोरोना’ टेस्ट ‘निगेटिव्ह’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून गुरुवारी राज्यात एकूण ७७८ नवीन रुग्ण आढळले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ६४२७ वर पोहचली आहे. राज्यात कोरोना संसर्गित रुग्णांच्या संख्येत वाढ जरी होत असली तरी एक दिलासादायक बाब समोर आली आहे.

राज्यातील कोरोना संसर्ग चाचण्यांचे प्रमाण वाढले असून दररोज ७ हजारापेक्षा अधिक चाचण्या घेण्यात येत आहे. सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने सादर केलेल्या अहवालानुसार, राज्यात आतापर्यंत झालेल्या एकूण चाचण्यांपैकी जवळपास ९४ टक्के चाचण्या निगेटिव्ह आल्या आहे. त्यामुळे राज्याला थोडासा दिलासा मिळणार आहे.

तर राज्यात कोरोना संसर्गित रुग्ण बरे होणाऱ्यांची संख्या दररोज वाढत आहे. २३ मार्च रोजी पहिले दोन रुग्ण बरे होऊन घरी गेले होते. त्यांनतर आजपर्यंत साधारणतः महिन्याभरात ७२२ रुग्ण उपचारानंतर घरी सोडण्यात आले. हे प्रमाण पाहता राज्यात दररोज २६ म्हणजे १३ टक्के रुग्ण बरे होत आहे. राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या सर्वाधिक असल्याने रुग्णांचे निदान होण्याची संख्या देखील वाढत आहे. मंगळवार पर्यंत राज्यात ८३ हजार १११ नमुन्यांपैकी ७७ हजार ६३७ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले तर ५२१८ जण पॉझिटिव्ह आलेत.

राज्यात कोरोना संसर्गित रुग्ण दुप्पट होण्याचा वेग मंदावला असून कालावधी आता सात दिवसांवर गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना, आयसीएमआर यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य शासनामार्फत कोरोना संसर्ग प्रतिबंध आणि उपचार केले जात आहे. राज्यात घाबरून जाण्याची स्थिती नाही. तसेच मुंबई मध्ये संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबई महापालिकेला दिल्या आहे. त्यासाठी शाळा, महाविद्यालये, यांचा वापर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.