…तर पोलिसांचे काय चुकले : नाना पाटेकर

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना हा अत्यंत संसर्गजन्य रोग आहे. याचा परिणाम अगदी वाईट असून स्मशानात जाळायला लाकडे शिल्लक राहणार नाही. उगाच बाहेर पडू नका. जेव्हा बाहेरुन तुम्ही घरात जाता तेव्हा स्वत:बरोबर हा रोग घेऊन जाता आणि संपूर्ण कुटुंबाबरोबरच समाजाला धोक्यात घालत आहात. त्यामुळेच अशावेळी कारण नसताना बाहेर पडणार्‍यांना पोलिसांनी दोन लाठ्या मारल्या, मुस्काट फोडले तर काय चुकले त्याचे ? असा सवाल अभिनेते नाना पाटेकर यांनी केला आहे.त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून अगदी हात जोडून लॉकडाउनच्या काळात घराबाहेर न पडण्याचे आवाहन जनतेला केले आहे.

सरकारने आपल्या सुरक्षेसाठी निर्बंध घातले आहेत याची जाण असलायला हवी. जे निर्बंध घातले आहेत ते कोणाच्या भल्यासाठी आहेत ? आपल्याच भल्यासाठी आहेत ना ? आपण बाहेर न जाण्यामुळे सगळे अर्थकारण थांबले आहे. याचा सरकारला काही फायदा आहे का ? त्याचे कारण आपल्याला माहिती नाही असेही नाही. सगळे माहिती असून सुद्धा मी रस्त्यावर उतरतो. कुतूहल म्हणून काय चाललये ते पहायला. उगाचच मोटरसायकल काढतो. काहीतरी खोटी कारणे देतो. किती मुर्खपणा आहे हा. मी केवळ माझा जीव धोक्यात घालत नाही इतरांचाही जीव धोक्यात घालत आहे.

आपण सर्वांना वेठीला धरतोय. कसला हा हव्यास हा ? तुम्ही बघा घरी बसलाय आणि मी रस्त्यावर आलोय हा मोठेपणा दाखवायला का हे सर्व? आणि अशावेळी दोन लाठ्या पोलिसांनी चढवल्या तर काय चुकले त्यांचे? पोलीस उगाचच मारताय का? ते हवेत लाठ्या फिरवतायत का? मी उगाचच मोटारसायकल घेऊन चाललोय. गळ्यात कपाळावर रुमाल बांधून. मग पोलिसांनी माझे मुस्काट फोडले तर काय चुकले त्याचे? असा सवाल नानांनी उपस्थित केला आहे.