Coronavirus : मराठवाड्यातील पैठणच्या लोकप्रिय ‘नाथषष्ठी’ यात्रेस कोरोनामुळे ‘स्थगिती’

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – मराठवाड्यामध्ये नाथषष्ठी यात्रा मोठ्या उत्साहात साजरा केली जात असते. ही यात्रा अत्यंत लोकप्रिय आणि लाखो-करोडो नाथभक्तांना एकत्र आणणारी अशी आहे. परंतु कोरोनोच्या भीतीमुळे ही यात्रा स्थगित करण्यात आली आहे. असा आदेश जिल्हाधीकारी कार्यालयाने दिले आहेत.

सध्या महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात यात्रांचे हंगाम सुरू झाले आहेत. दरम्यान मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या काही दिवसांत यात्रा भरणार आहेत. यामध्येच औरंगाबाद जिल्ह्यातील नाथषष्ठी आणि मांगीरबाबा या यात्रांचाही समावेश आहे. या यात्रांना प्रचंड प्रमाणात गर्दी येत असते. ही यात्रा १४ ते १६ मार्च दरम्यान पैठण येथे होणार होती.

दरम्यान सोमवारी कोरोना विषाणूच्या नियंत्रणाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तालयात बैठक घेण्यात आली असून या बैठकीला जिल्हाधिकारी, आरोग्य उपसंचालक, घाटी अधिष्ठाता, महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते. तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मराठवाड्याच्या आठ जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी प्रत्येकी २ कोटी रुपये कोरोना विषाणूच्या उपचारासाठी राखून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम जिल्हा शल्यचिकित्सक, एनआरएचएम अंतर्गत राखीव ठेवण्यास सांगितले आहे.