पुण्यात महापौर आणि 6 नगरसेवकांना आतापर्यंत ‘कोरोना’ची लागण, 2 खासदारांसह 4 आमदारांनी केलं स्वतःला ‘क्वारंटाईन’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात पुणे आणि मुंबईसह इतर महत्त्वाच्या शहरातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पुण्यात कोरोना बाधित रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आल्यानंतर आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या लाखांच्यावर गेली आहे. पुणे शहरात आजही कोरोनाचं हॉटस्पॉट बनलं आहे. अशातच आता पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना कोरोनाची लागण झाली झाली आहे. त्यामुळे महापालिका वर्तुळात भीतीचं सावट निर्माण झालं आहे.

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापौर यांच्यानंतर आता विरोधी नेत्यासह सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. या बातमीनं पुण्यातील राजकीय वातावरण हादरून गेलं आहे. महापालिकेत कोरोनाचा एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिरकाव झाल्याने पालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये देखील भितीचे वातवरण आहे. महापौर आणि सहा नगरसेवक यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुण्यातील दोन खासदार आणि चार आमदरांनी स्वत:ला क्वारंटाईन केले आहे. तर आतापर्यंत महापालिकेतील 200 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालं आहे. पुणे महापालिकेत इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाल्याने कर्मचारी आणि नगरसेवकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पदाधिकारी व अधिकाऱ्यांसोबत नाला सफाई आणि पावसाची पूर्व कामांची पाहणी केली होती. या दरम्यान त्यांनी दोन वेळा कोरोना तपासणी करून घेतली होती. ही तपासणी निगेटिव्ह आली होती. यापूर्वी त्यांना किरकोळ सर्दी, खोकला होणे असा त्रास झाला होता. दरम्यान त्यांना ताप आल्याने त्यांनी कोरोना टेस्ट करून घेतली. ही टेस्ट मात्र पॉझिटिव्ह आली. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विट करून दिली. यानंतर त्यांच्या कुटुंबातील 8 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं. दरम्यान, उपमहापौर सरस्वती शेडगे यांनी आपल्याला कोरोनाची लागण झालेले नाही असे सांगितले आहे. त्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे वृत्त समोर आले होते. ते खोटे असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे.