Coronavirus : ‘होम क्वारंटाईन’ची मुदत संपल्यावर ठाण्यात तिघे ‘पॉझिटिव्ह’

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन –  होम क्वारंटाईनच्या कालावधीत त्यांच्यात कोणतीही कोरोनाची लक्षणे आढळून आली नव्हती. १४ दिवसांची मुदत संपल्यावर त्यांची चाचणी केली असताना ते तिघे पॉसिटिव्ह असल्याचे आढळून आले. त्यामुळे ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. एकाच घरातील तिघे पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हे तिघे रहात असलेल्या दोन्ही सोसायट्या सील करण्यात आल्या आहेत.

ठाण्यात राहणारे हे तिघेही दुबईहून परत आले होते. विमानतळावर त्यांची तपासणी केली. तेव्हा त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाही. त्यामुळे त्यांना होम क्वारंटाईन राहण्यास सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे त्या तिघांनी स्वत: ला आपल्या घरात अलग करुन ठेवले होते. १४ दिवसांची कालावधी संपल्यावर त्यांची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

त्यामुळे त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाने येथील श्रीरंग आणि वृंदावन सोसायट्यांना सील केले असून सर्व रहिवाशांना घरातून बाहेर पडण्यास बंदी घातली आहे. वैद्यकीय, आपत्कालीन परिस्थिती किंवा कोणत्याही प्रकारच्या किराणा सामान आणि भाजीपाल्याची आवश्यकता असेल तर आम्ही तुम्हाला तुमच्या घराच्या पायर्‍यावंर पुरवू़ पण खाली उतरु नका असे या सोसायट्यांच्या पदाधिकार्‍यांनी सर्व रहिवाशांना कळविले आहे.