Coronavirus : 3 कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिस आयुक्तांनी घेतला ‘हा’ संवेदनशील निर्णय

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – धोकादायक वयोगटातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस आयुक्त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ५५ वर्ष किंवा त्याहून जास्त वय असलेल्या, मधुमेह किंवा हृदयरोगाने त्रस्त असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याचा निर्णय आयुक्तांकडून घेण्यात आला. यामुळे असे कर्मचारी सोमवार पासून (काल) लॉकडाऊन संपेपर्यंत भरपगारी रजा घेऊ शकतात.

५५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या व आजारांचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर न बोलावण्याचा सूचना आयुक्तांकडून पोलीस ठाण्यांना आणि वाहतूक पोलीस विभागांना देण्यात आल्यात. स्वतःहून कामावर यायची इच्छा असल्यास त्यांना येऊ द्यावं, असं देखील आयुक्तांनी म्हटलं आहे. गेल्या ४८ तासांत कोरोना संसर्गामुळे मुंबई पोलीस दलातील तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यांनतर आयुक्तांनी पोलीस ठाण्यांना आदेश दिले.

पोलीस ठाण्यातील व वाहतूक विभागातील ५५ वर्षांवरील हवालदारांना सुट्टी देण्याच्या सूचना केल्या, असून गंभीर शारीरिक आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील घरी राहण्याचे आदेश देण्यात आलेत. अशी माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, पोलीस आयुक्तालयातून पन्नाशी उलटलेल्या आणि मधुमेह किंवा हृदयविकार असलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आल्याचे सांगितले.