काय सांगता ! होय, ‘कोरोना’मुळं बलात्कारातील आरोपी 7 वर्षांनंतर जाळ्यात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गावामधील एका महिलेवरती बलात्कार करून फरार असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी पोलिसांना तब्बल सात वर्षे चकमा देत होता. पांडुरंग यशवंत शेंगाळ (वय ५२) असं आरोपीचं नाव असून, तो कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे तो मूळ गावी परतला आणि पकडला गेला.

सदरील आरोपी संगमनेर तालुक्यातील असून २०१३ साली गावातील महिलेवरती बलात्कार करून तो शहरामध्ये पळून गेला होता. शेंगाळच्या विरुद्ध पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता. त्यावेळी पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता. पण ओळख लपवून राहत असल्यानं त्याला पकडण्यात पोलिसांना अद्यापपर्यंत यश आलेलं नव्हतं.

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गाला घाबरून शेंगाळही गावी परतला होता. संगमनेर येथील डोंगराळ परिसरात तो आपलं नाव आणि ओळख लपवून राहत होता. मात्र, गावी परतल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने डोंगराळ भागात जाऊन त्याला पकडले . ग्रामस्थांच्या मदतीनं त्याची ओळख पटवण्यात आली. पुढील चौकशीसाठी त्याला घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.