Coronavirus Impact : भारतासह अमेरिकेवर मंदीची टांगली ‘तलवार’ मात्र चीनसाठी ‘मूड’ चांगला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. या महाभयंकर रोगामुळे जगालाच टाळे ठोकण्याची वेळ आली आहे. अमेरिका, भारत, चिनसह युरोपमध्येही लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. सध्या जगातील मोठमोठ्या अर्थव्यवस्थेवर मंदीची टांगती तलवार असल्याचा इशारा मूडीजने दिला आहे. असे असले तरी चीनची अर्थव्यवस्था चांगली राहणार असल्याचा अंदाज मूडीजने वर्तवला आहे.

मूडीजने वर्तवलेल्या अंदाजानुसार जी-20 देशांचा मिळून सकल घरगुती उत्पादन दर म्हणजेच जीडीपी-2020 मध्ये 0.5 टक्क्यांनी घटणार आहे. यामुळे अमेरिकी अर्थव्यवस्थेला दोन टक्के आणि युरो वापरणाऱ्या देशांना 2.2 टक्क्यांचा फटका बसणार आहे. असे असताना मात्र कोरोना व्हायरसचे केंद्र स्थान असलेल्या चीनची अर्थव्यवस्था 3.3 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता मुडीजने वर्तवली आहे.

जी -20 मध्ये या देशांचा समावेश
जी-20 मद्ये अर्जेंटीना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपीय संघ, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेस्किको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूनाइटेड किंगडम आणि संयुक्त अमेरिकेचा समावेश आहे. या देशांचा जगाच्या जीडीपीत 85 टक्के वाटा आहे. तसेच जागतिक व्यापारामध्येही या देशांचा 80 टक्के आहे.

200 कोटी लोक घरात
जी -20 मध्ये असलेल्या देशांमध्ये जगातील दो तृतियांश लोकसंख्या राहते. कोरोनामुळे जगभरात 21 हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे जगभरातील 200 कोटी लोकांना घरामध्ये बसावे लागले आहे. म्हणजेच जगातील 20 टक्के लोकसंख्या सध्या घरात बसून आहे. तर जवळपास दोन डझन देशांनी लॉकडाऊन केले आहे.