Coronavirus : खा. अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर ‘निशाणा’, म्हणाले – ‘गाइडलाइनमधील गोंधाळानं देशात वाढतोय कोरोना’

पोलिसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादीचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवरती टीका केली आहे. एकीकडे कोरोना संसर्गावरती मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्न करत आहे. मात्र, एवढं असूनही राज्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत अनेकांनी महाविकास आघाडीवरती बोट दाखविल्यामुळे अमोल कोल्हे यांनी थेट मोदी सरकावर हल्ला चढवला आहे.

एका वृत्तसंस्थेला बोलताना अमोल कोल्हे यांनी म्हटलं की, पहिला लॉकडाऊन झाला, त्यावेळी आपल्याकडे ५०० ते ५५० एवढे रुग्ण होते. पहिला लॉकडाऊन जेव्हा संपला तेव्हा आपण १० हजार रुग्णांचा टप्पा गाठला होता. दुसरं लॉकडाऊन संपला तेव्हा आपण २५ ते ३० हजारांचा टप्पा ओलांडला होता. मात्र, आज आपण ७५ हजारांच्या घरात आहोत आणि कदाचित १७ तारखेपर्यंत ८० हजारांचा टप्पा ओलांडून पुढं जाऊ, असा अंदाज वाटतोय. जर आपण सामूहिक संसर्ग टाळण्यासाठी हा लॉकडाऊन केलेला होता, तर आपल्याला यात किती यश मिळालं हा आत्मपरीक्षणाचा भाग आहे. पायाभूत सुविधा करण्यात महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. केंद्र सरकारच्या गाइडलाइनमध्ये एक धरसोड वृत्ती पाहायला मिळाली. गेल्या लॉकडाऊन दरम्यान दोन-तीन दिवसांनंतर एक नवीन सूचना येत होती. जर दोन दिवसांनी जेव्हा सूचना बदलायला सुरुवात होते, तेव्हा यंत्रणेमध्ये गोंधळ उडतो, असं सांगत कोल्हेनी केंद्र सरकारवरती निशाणा साधला.

महाराष्ट्र सरकारनं लॉकडाऊन चा दुसरा टप्पा व्यवस्थित पूर्ण केला. पण देशपातळीवर तो कशा स्वरूपात पूर्ण झाला, याबाबत संभ्रमाच वातावरण आहे. जर्मनी दर १० लाख लोकांच्या मागे २५ हजार चाचण्या घेत, न्यूझीलंड २२ हजार चाचण्या घेत, पेरूसारखा देश ५ हजार चाचण्या घेत. तिथं भारताचं टेस्टिंग हे केवळ ५०० ते ६०० दरम्यान आहे. मग हा प्रश्न पडतोच की, नक्की आपण कोणाला फसवतो आहे. आपण स्वतःला फसवतो आहे की, जगाला फसवतो आहे.

भारताने कोरोना संसर्गावर कस नियंत्रण मिळवलं हे जगाला दाखवून देण्यासाठी जर आपण असं करत असू, तर ती मोठी चूक आहे. देशात कोरोना संसर्गाचा आकडा ८० हजारांवरती पोहचल्यानंतर आपण मजुरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी ट्रेन सुरु करतोय, मग आपल्या पॉलिसीमध्ये गडबड झाली की नाही हे शोधावं लागेल. केंद्र सरकारने अद्यापही सुस्पष्ट असं धोरण मांडलं नाही. याचा अजूनही अभाव आहे. स्वदेशी, लोकलविकल या पंतप्रधानांच्या आवाहनाचं मी नक्कीच स्वागत करतो. पण हे सगळं कागदावरच न राहता सर्वसामान्यांना त्याचा फरक काय पडणार आहे हे जोपर्यंत सर्वसामान्य माणसाला समजत नाही. तोपर्यंत त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार नाही. असं कोल्हे यांनी बोलताना सांगितलं.

देशात लॉकडाऊन आणि कोरोना संसर्ग चाचण्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आज एक नंबरला आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत देखील महाराष्ट्र एक नंबरला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून सातत्यानं होणारे गाइडलाइनमध्ये बदल आणि सुस्पष्टता नसल्यामुळे संभ्रम निर्माण होत आहे. राज्यातील सरकार पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली चांगलं काम करतंय, असं म्हणत सरकार अस्थिर करणाऱ्यांचा देखील त्यांनी चांगला समाचार घेतला.