Coronavirus : अमरावती जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सक डॉक्टरांसह 25 जण पॉजिटीव्ह

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – नाशिकमधील ऑक्सिजन टाकीच्या गळतीमुळे २५ रुग्णांच्या मृत्युच्या घटनेनंतर आता आणखी एक नवीन संकट राज्यातील रुग्णालयांपुढे येऊ घातले आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका व इतर स्टाफ हे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण वाढले आहे. अगदी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अमरावती जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिकांसह २५ जणांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सध्या रुग्णांनी हॉस्पिटल भरुन वाहत असताना अशाप्रकारे इतक्या मोठ्या संख्येने आरोग्य सेवेतील अधिकारी, कर्मचारी बाधित झाल्याने हॉस्पिटलवर मोठा ताण आला आहे. अमरावती जिल्हा रुग्णालयातील जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच या रुग्णालयातील १९ नर्स आणि ५ सपोर्ट स्टाफ असे एकूण २५ जणांना एका आठवड्याभरात कोरोनाची लागण झाली आहे.

विशेष म्हणजे या सर्वांनी लसीकरण सुरु झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच लस घेतली होती. त्यांना दोन्ही डोस देण्यात आले होते. अमरावती जिल्हा रुग्णालयात केवळ अमरावतीच नाही तर शेजारील जिल्ह्यांमधून रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. एकाचवेळी इतके जण पॉझिटिव्ह झाल्याने इतर परिचारिका व सपोर्ट स्टाफवर मोठा ताण आला आहे.