दररोज 10 लाख लसी देण्यासाठी अपोलो हॉस्पीटलची यंत्रणा सुसज्ज, आरोग्य सेवकांना ट्रेनिंग देणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दररोज दहा लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लस टोचता येईल अशी यंत्रणा आम्ही सज्ज ठेवली आहे, असे अपोलो हॉस्पिटल्सकडून गुरुवारी जाहीर करण्यात आले. अपोलो उद्योगसमूहाकडे शीतगृहांच्या सोयीसह औषधांच्या पुरवठ्यासाठी १९ सुसज्ज केंद्रे उपलब्ध आहेत. या समूहाकडे ७० रुग्णालये, ४००हून अधिक दवाखाने, ५०० आरोग्य केंद्रे, ४००० फार्मसी तसेच अपोलो ट्वेंटी फोर बाय सेव्हन हा ओमनी चॅनेल डिजिटल प्लॅटफॉर्म आहे.यासाठी १० हजार आरोग्य सेवकांना या लसीकरणासाठी चार महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

केइमेडकडे औषधांचा साठा करण्यासाठी शीतगृहांची मोठी साखळी व वितरणाची उत्तम यंत्रणा आहे. केइमेड ही अपोलोची संलग्न कंपनी आहे. केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लस विकत घेण्यासाठी खासगी क्षेत्राला परवानगी दिल्यास अपोलो हॉस्पिटल्स उत्पादकांकडून ही लस विकत घेऊन ती इच्छुक व्यक्तीला तसेच रुग्णाला टोचली जाईल असे अपोलो हॉस्पिटल्सच्या एक्झिक्युटिव्ह व्हाइस चेअरपर्सन शोभना कामिनेनी यांनी सांगितले आहे. कोरोना लसीचा कोणत्याही व्यक्तीस केवळ एक डोस देऊन भागणार नाही तर त्याला आणखी डोस द्यावे लागतील.

शीतगृहांच्या विस्ताराची योजना
कोरोना प्रतिबंधक लसीच्या साठवणूक व वितरणासाठी देशात किती शीतगृहे उपलब्ध होऊ शकतील याची चाचपणी केंद्र सरकारकडून नेमलेल्या तज्ज्ञांच्या गटाकडून सुरु करण्यात आली आहे. शीतगृहांच्या साखळीचा विस्ताराचीही योजना या गटाकडून तयार करण्यात येत आहे. या गटांमध्ये काही उपगट पण आहेत त्यांच्याकडून कोरोना प्रतिबंधक लसीच्या संशोधनापासून ते उत्पादनापर्यंत अनेक गोष्टींवर मंथन करण्यात येणार आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR)या संस्थेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १४ ऑक्टोबर रोजी ११. ३६ लाख कोरोना चाचण्या करण्यात आल्या.त्यामुळे या चाचण्यांची एकूण संख्या ९. १२ कोटी इतकी झाली आहे.