पोलिसनामा ऑनलाईन टीम – लॉकडाउन जसजसा वाढत चालला आहे, तसतसा आता कोकीळा पण कोविड कोविड आवाज देत असल्याचा भास होते असल्याचे मजेदार वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी केले आहे.
एका वृत्तवाहिनीशी त्यांनी मुखाकत दिली.
लॉकडाउनमध्ये सुखावणार काहीच नसून कुठच्याही बाजूने सुख नाही. पण अशाप्रकारे शांतता अनुभवायला मिळणे हे गेल्या कित्तेक वर्षांमध्ये आठवतच नाही. जन्मापासून कधी शहरात इतकी शांतता अनुभवल्याचे मला आठवतच नाही. कधीतरी आपण बाहेरगावी जातो किंवा जंगलामध्ये किंवा इतर ठिकाणी जातो तेव्हा जी शांतता असते ती पाहून आपण म्हणतो की वा काय शांतता आहे. तीच शांतता आज आपल्याला या ठिकाणी सर्व शहरांमध्ये अनुभवायला मिळतेय. पक्षांचे आवाज ऐकायला येत आहेत.
ज्या दिवशी लॉकडाउन सुरु झाला त्या दिवशी सकाळी ‘कन्या’ मी आमच्या श्वानासोबेत खेळत होतो. एरव्ही कोकीळेचा जो आवाज आपल्या सर्वांनाच ऐकू येतो. पण इतक्या शांततेमध्ये इतक्या पक्षांचे आवाज कधी ऐकले नव्हते. त्या कोकीळेचा आवाज आधीही ऐकू यायचा. पण तो जो कुहू कुहू आवाज आहे तो इतक्या शांततेत कधी ऐकला नव्हता. पण जसा जसा तो लॉकडाउन वाढत गेला ना तसा तसा तो कुहू कुहू कोकीळेचा आवाज आहे ना तो मला कोविड कोविड ऐकू यायला लागला असल्याचे त्यांनी सांगितले.