Corona Virus : भारतात ‘कोरोना’ची ‘एन्ट्री’ झाल्यानं सरकार ‘अलर्ट’, जगभरात 3000 हून जास्त लोकांचा मृत्यू, 70 देशांमध्ये भीतीचं वातावरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनपासून संपूर्ण जगात वेगाने पसरत असलेल्या कोरोना विषाणूने दिल्लीतही हजेरी लावली आहे. इटलीहून दिल्लीला परतलेल्या एका व्यक्तीला या प्राणघातक विषाणूचा त्रास असल्याचे आढळले आहे. त्याचवेळी, या विषाणूला बळी पडलेला आणखी एक व्यक्ती सध्या तेलंगणामध्ये आहे, जो दुबईहून परतला आहे. दरम्यान, कर्नाटक सरकारने कोरोना व्हायरस संदर्भात तातडीची बैठक बोलविली आहे. जगभरात कोरोना विषाणूमुळे मृतांचा आकडा 3,000 च्या वर गेला आहे. चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी 42 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह, चीनमध्ये या संसर्गामुळे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या वाढून 2912 झाली आहे. कोरोनाचा धोका लक्षात घेता ब्रिटीश एअरवेजने 16 मार्च ते 28 मार्च दरम्यान 216 उड्डाणे रद्द केली आहेत.

88,000 पेक्षा जास्त लोकांना संसर्ग

आरोग्य अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, कोरोनामुळे जगभरात 3000 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 88,000 पेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये प्रथमच या प्राणघातक संसर्गाचे निदान झाले होते आणि आतापर्यंत हे 70 देशांमध्ये पसरले आहे. कोरोना विषाणूमुळे 88,000 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे, त्यापैकी एकट्या चीनमध्ये 80,000 पेक्षा जास्त प्रकरणे आहेत.

राजस्थान सरकार देखील अलर्ट

भारतात कोरोना विषाणूमुळे ग्रस्त 2 नवीन रुग्ण आढळले आहेत. एक रुग्ण दिल्लीचा आणि दुसरा तेलंगणात आहे. त्यानंतर राजस्थान सरकार असेही म्हणत आहे की त्यांच्या राज्यात उपस्थित असलेल्या व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती आहे, कारण त्याचाही एक नमुना पॉझिटिव्ह आहे.

70 देशांमध्ये कोरोनाची भीती

यापूर्वी भारतात कोरोना विषाणूची केवळ 3 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. तिन्ही प्रकरणे केरळमधली असून रूग्ण उपचारानंतर बरे झाले होते. कोरोना विषाणूचा प्रसार जगभर वेगाने होत आहे. ज्या देशांमध्ये रूग्णांची संख्या मोठी आहे तेथे मृतांचा आकडाही वाढत आहे. इराण, जपान, दक्षिण कोरिया, इटली आणि आता अमेरिकेतही हा विषाणू मृत्यूचे कारण बनत आहे. चीनमधून पसरलेला विषाणू आतापर्यंत 70 देशांमध्ये पसरला आहे.

इराण, दक्षिण कोरिया आणि इटली हा चीनबाहेर कोरोना विषाणूचा सर्वात मोठा हॉट स्पॉट असल्याचे म्हटले जात आहे. इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे आणखी 11 जणांचा मृत्यू झाला आणि मृतांचा आकडा 54 पर्यंत पोहचला. दक्षिण कोरियामध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये, 29 तर अमेरिकेत आतापर्यंत 6 लोकांचा मृत्यू झाला आहे.

पर्यटन उद्योगालाही धोका

या विषाणूने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. अशातच युरोपिअन युनिअनने कोरोना व्हायरसची शोक्याची पातळी वाढल्याचे म्हंटले आहे. खरेतर युरोपमध्ये हा व्हायरस सतत पसरत आहे. खरंतर जगभरात या व्हायरस मुळे पर्यटन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. खरंतर १५ मार्च ते १ एप्रिल दरम्यान आंतरराष्ट्रीय पर्यटन उद्योग आपल्या उच्च पातळीवर असतो पण यंदा कोरोनामुळे अनेक तिकीट रद्द झाली आहेत. ट्रॅव्हल एजंट्सच्या म्हणण्यानुसार 90 टक्के बुकिंग रद्द करण्यात आली आहे.

दिल्ली-एनसीआरलाही नुकसान

थायलंड, सिंगापूर आणि मलेशियामधील क्रूझ बुकिंग पूर्णपणे रद्द करण्यात आले आहे. एखाद्या महामारीप्रमाणे हा विषाणू दिल्ली-एनसीआरच्या पर्यटन उद्योगातही पसरला आहे. या उद्योगाला आतापर्यंत 100 कोटींचे नुकसान झाले आहे.

चीनने कोरोना विषाणू तयार केला ?

दरम्यान, इस्रायली गुप्तचर यंत्रणेच्या एका माजी अधिकाऱ्याने असा दावा केला आहे की चीनने प्रयोगशाळेतच कोरोना विषाणू तयार केला होता कारण तो त्यातून जैविक शस्त्रे तयार करीत होता. तथापि, चीन सरकार हे सर्व दावे पूर्णपणे नाकारत आहे. त्यांच्या मते या विषाणूचा प्रयोगशाळेशी काही संबंध नाही.