Coronavirus : मराठवाड्यात ‘कोरोना’चा पहिला बळी ! औरंगाबादच्या शासकीय रूग्णालयात 52 वर्षाच्या रूग्णाचा मृत्यू

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसमुळं औरंगाबाद शहरात एकाचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यातील कोरोनाचा हा पहिला बळी आहे. दरम्यान, शहरातील 5 जणांचे कोरोनाचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आणि त्यामधील 52 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली आहे. कालच मराठवाड्याच्या लातूर जिल्हयात 8 रूग्णांची कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे आता मराठवाड्यातील नागरिक देखील कोरोनामुळं भयभीत झाले आहेत.


औरंगाबादमध्ये मृत्यू झालेल्या 52 वर्षीय रूग्णावर शासकीय (घाटी) रूग्णालयात उपचार चालू होते. उपचारादरम्यानच त्याचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्या रूग्णास उच्च रक्तदाब आणि मधुमेह देखील होता. औरंगाबादमध्ये कोरोनामुळं रूग्णाचा मृत्यू झाला असल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. पुण्यात देखील 24 तासात तिघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे 26 नवीन रूग्ण आढळून आले असून आता राज्याची संख्या 661 वर जाऊन पोहचली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा फैलाव होत असल्याने प्रशासनानं नागरिकांना घरा बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे.