आवश्यकतेनुसार रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा वापर न करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करा – अजित पवार

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी रेमडेसिविर आणि ऑक्सिजन बाबत प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या आहेत. गरजेनुसार ऑक्सिजनचा वापर करण्यात यावा. खासगी हॉस्पिटलमध्ये गरजेनुसार रेमडेसिविर किंवा ऑक्सिजनचा वापर होत नसेल तर अशा रूग्णालयांवर तपासणी पथक नेमून कारवाई करण्यात यावी असे ते म्हणाले. बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात शुक्रवारी ‘कोरोना विषाणू संसर्ग निर्मूलन आढावा बैठकीत पवार बोलत होते.

पुढे अजित पवार म्हणाले, गरज नसताना रेमडेसिविर आणि ऑक्सिजनसाठी रूग्ण आणि नातेवाईकांची कोंडी करणाऱ्या खासगी हॉस्पिटलवर आता तपासणी पथकाची करडी नजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवावेच लागेल. शासकीय यंत्रणांचे प्रयत्न आणि बारामतीतील नागरिकांच्या सहकार्याने कोरोनाच्या संकटावर लवकरच नियंत्रण मिळवू. सद्यस्थितीत बारामती शहर आणि ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वारंवार वाढत आहे. ही बाब चिंतेची असून कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचा विषय सर्वांनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. सर्व विभागांनी समन्वय साधून काम करणे गरजेचे आहे. असे ते म्हणाले.

या दरम्यान, लसीकरणाचा वेग वाढवावा. वैद्यकीय सामग्री आणि औषधांची तसेच निधीचीही कमरतरता पडू दिली जाणार नाही. सॅनिटायझरचा तसेच मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर राखावे व प्रशासनास सहकार्य करावे, ऑक्सिजन वापराबाबतही सर्व रूग्णालयांनी काळजीपूर्वक वापर करावा, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.