Coronavirus : हॉस्पीटलमध्ये क्वॉरन्टाईन होण्यापेक्षा होम क्वाॉरन्टाईन व्हा – अजित पवार
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनापासून बचावासाठी होम किंवा हॉस्पीटल क्वारन्टाईन हे दोनच पर्याय आज उपलब्ध आहेत. कोरोनामुळे हॉस्पीटल क्वॉरन्टाईन होण्यापेक्षा लोकांनी स्वत:हून होम क्वॉरन्टाईन होऊन कुटुंबाचं संरक्षण करावं असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. जे आज घरात थांबणार नाहीत ते काही दिवसांनी हॉस्पीटलमध्ये दिसतील असेही त्यांनी सांगितले.
कोरोनाबाबतच्या काहींच्या बेजबाबदारपणामुळे रुग्णांची संख्या वाढतेय, बाजारात होत असलेल्या गर्दीमुळे तुमच्या घरामध्ये कोरोना पोहचण्याचा धोका निर्माण झाला आहे. गावगुंडांकडून पोलिसांवर हल्ले होत आहेत. या समाजविघातक घटनांची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. कोरोनासंदर्भातील नियम मोडणाऱ्या तुरुंगाची हवा खावी लागेल, त्याची सुरुवात काल पासून सुरु झाली आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच राज्यात अन्नधान्य, खाद्यतेल, दूध, भाजीपाला, औषधं, इंधनाचा मुबलक साठा असून नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये.
अजित पवार यांनी पुढे सांगितले की, राज्य सरकारने आवाहन केल्यानंतर अनेक खासगी डॉक्टरांनी त्यांचे दवाखाने, हॉस्पीटल सुरु केले आहेत. मात्र, ज्यांनी अद्याप दवाखाने सुरु केले नाहीत त्यांची दखल राज्य सरकार आणि स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. या डॉक्टरांवर निश्चित कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आज राज्यात रामनवमी, साधेपणाने साजरी केल्याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले आहेत. या पुढचे सण, उत्सव साधेपणाने साजरे करावेत असेही आवाहन त्यांनी केले.