‘टेस्ट-ट्रॅक- ट्रिट’ त्रिसुत्रीमुळे रिकव्हरी रेट वाढला : आरोग्य मंत्रालय

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढतच आहे. मात्र, कोरोनामुक्त होणार्‍यांच्या संख्येतही दिवसागणिक भर पडत आहे. मागील पाच महिन्यांमध्ये देशभरात तीन चतुर्थांश पेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली समोर आली आहे. केंद्र सरकारच्या टेस्ट, ट्रॅक, ट्रिट त्रिसुत्रीची प्रभावीपणे अमंलबाजवणीमुळे, कोरोनामुक्त होणार्‍यांचे प्रमाण (रिकव्हरी रेट) अधिक व मृत्यू दर कमी असल्याचे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशभरात मागील पाच महिन्यात तीन चतुर्थांशपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित एक चतुर्थांश पेक्षाही कमी रुग्ण सध्या अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यामुळे राबविलेल्या त्रिसुत्रीचा परिणाम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. देशात काल कोरोनाबाधितांच्या संख्येचा उच्चांक नोंदविण्यात आला. 24 तासांमध्ये 75 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. यामुळे देशातील करोनाबाधितांची संख्या 33 लाखांच्याही पुढे गेली आहे. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश व तामिळनाडू या प्रमुख राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.