काय सांगता ! होय, कुटुंब घरातच असताना महापालिकेनं पत्रे ठोकून ‘सील’ केलं घर

पोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनामुळे घरे सील करताना महापालिकेच्या कर्मचार्‍यांनी घराबाहेर पत्रे ठोकून कुटुंबांनाच कोंडल्याचा धक्कादायक प्रकार बंगळुरुत घडला आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात आला. अखेर महापालिका आयुक्तांना याप्रकरणी माफी मागावी लागली. महापालिका कर्मचार्‍यांनी दोन फ्लॅटचे दरवाजे सील केले होते. या घरांमध्ये एक महिला, दोन लहान मुलं आणि वृद्ध नागरिक वास्तव्यास होते.

घटनेनंतर संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर महापालिका आयुक्त एन मंजुनाथ प्रसाद यांनी तात्काळ पत्रे हटवण्याचा आदेश दिला. महापालिका कर्मचार्‍यांच्या अतिउत्साही कारवाईबद्दल माफी मागितली. एन मंजुनाथ प्रसाद यांनी ट्विट करत बॅरिकेड्स लगेच हटवले जातील याची मी काळजी घेतली आहे. सर्वांना आदराने वागणूक देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. संसर्ग झालेल्यांचे संरक्षण करणे आणि न झालेल्यांना सुरक्षा देणे हा कंटेनमेंटचा हेतू असल्याचे सांगितले आहे.

बंगळुरु प्रशासन सध्या कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चिंतेत आहे. दरम्यान मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी यापुढे कंटेनमेंट झोन वगळता लॉकडाउन जाहीर केला जाणार नाही असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. 55 पेक्षा जास्त वय असणार्‍या नागिरकांना घरातच थांबण्याची विनंती केली आहे.