Coronavirus : कृती समितीचा इशारा, बेस्टचे कामगार सोमवारपासून घरीच ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – मुंबईची दुसरी जीवनवाहिनी असलेली बेस्ट सेवा लॉकडाऊन काळातही रस्त्यावर धावत आहे. मात्र, बेस्ट कर्मचाऱ्यांचा रोज थेट जनतेशी संपर्क येत असल्याने त्यांच्यामध्ये कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. आतापर्यंत ९५ कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्गाची लागण झाली असून सहा जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु, या परिस्थितीत कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसासाठी आवश्यक त्या मागण्या मान्य न केल्यास सोमवारपासून ‘बेस्ट’ सेवा कर्मचारी घरीच राहतील, असा इशारा बेस्ट संयुक्त कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे.

राजधानी मुंबईत कोरोना संसर्गाचा प्रसार वाढल्यानंतर संपूर्ण शहर पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, आरोग्य, सुरक्षा, आपत्कालीन अशा सेवेतील कर्मचाऱ्यांना बेस्टच्या वाहतूक विभागामुळं दररोज कार्यालयात पोहचणे शक्य झालं. पण, जीवाचा धोका पत्करून कामावर येणाऱ्या बेस्ट वाहतूक आणि विद्युत विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याकडे महापालिका आणि बेस्ट प्रशासन दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे अडचणींचा सामना करून कामावरती येणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगार कपातीची धमकी दिली जात असल्याची नाराजी कामगार संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.

वेतन नव्हे तर नोकरकपातीचा डाव…

बेस्टच्या सेवेतील ६० टक्के कामगार वर्ग हा मुंबई हद्दीच्या बाहेर राहतो. त्यांना कामावरती पोहचण्यास वेळेवर गाड्या उपलब्ध नसतात. काही कामगार वर्गाच्या इमारती, वस्ती सील झाल्यामुळे ते अडकून पडले आहेत. परंतु, त्यांची अडचण समजून घेतली जात नाही. बेस्ट सेवेचा डाव हा वेतन कपातीचा नसून भविष्यात नोकर कपातीचा असल्याचं दिसून येत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय न घेतल्यास बेस्ट कामगार वर्ग येत्या सोमवारपासून १०० टक्के लॉकडाऊन पाळून उत्तर देईल, असा इशारा ‘बेस्ट’ कृती समितीचे अध्यक्ष शशांक राव यांनी दिला आहे.

बेस्ट कामगारांच्या काही प्रमुख मागण्या

१. प्रत्येक बेस्ट कामगारांची कोरोना संसर्गित चाचणी रोजच्या रोज बस आगारामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली जावी.

२. कोरोना संसर्गित व लक्षणे असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र रुग्णालयाची मागणी.

३. एखादा कर्मचारी कोरोना संसर्गित आढल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या सहकाऱ्यांसाठी विलगीकरण प्रक्रिया राबवावी.

४. बेस्ट कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर इत्यादी साधने त्वरित पुरविण्यात यावी.

५. कर्तव्यावर उपस्थित असलेल्या आणि कोरोना संसर्गित होऊन मृत्युमुखी झालेल्या बेस्ट कामगारांना, तसेच इतर आस्थापनातील कामगार व पोलीस यांना शहीद दर्जा देऊन सवलती देण्यात याव्या.

६. कामगारांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी सकस आहार देणे.

७. बेस्ट कामगार व त्यांच्या कुटुंबियांना एक कोटीचे विमा संरक्षण, कामगारांना ने- आण करण्यासाठी स्वत्रंत बस सेवा उपलब्ध करून देण्यात यावी.