Lockdown : सरकारकडून दूध उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा ! 25 रूपयाच्या दरानं होणार 10 लाख लिटर दुधाची खरेदी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारच्या वतीने ‘कोरोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूधउत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दुधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करण्यात येणार आहे. यासाठी येणाऱ्या चार-पाच दिवसांमध्ये हे दूध संकलन सुरु होईल व कोरोनाचा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरु राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला.

कोरोनोच्या वाढत्या प्रभावामुळे दूधविक्रीत घट झाली असून गावागावात दूध स्वीकारले जात नाही त्यामुळे राज्यामधील दूध उत्पादक शेतकरी व दुध व्यवसाय अडचणीत सापडला आहे.तसेच राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दूधापैकी १० लाख लिटर दूध अतिरिक्त होत आहे.तर खाजगी बाजारात दुधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलिटर खाली गेल्यामुळे शेतकरी,गोरगरीब दूधउत्पादकांना याचा फटका बसत आहे.

यामुळे शेतकऱ्यांना दिलासा व आधार देण्यासाठी तसेच ‘कोरोना’च्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असणारे १० लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या मार्फत शासन २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करेल. त्या दुधाची भुकटी करून ती साठवली जाऊन नंतर त्याची ऑनलाइन माध्यमातून विक्री केली जाईल. यासाठी साधारणपणे २०० कोटींचा निधी लागेन,असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ,दुग्धविकासमंत्री सुनील केदार ( दुरध्वनीद्वारे) ,वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक आदी उपस्थित होते.

You might also like