Pravin Darekar : ‘नवाब मलिक कमी बोलले, तर अडचणी कमी होतील’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  राज्यासह देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. कोरोनामुळे अनेक लोक मृत्युमुखी पडले आहेत. अनेक लोकांची अवस्था बिकट झाली आहे. आणि दुसरीकडे सत्ताधारी आणि विरोधक परस्परांस आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या टिकेवरून आता भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवाब मलिक कमी बोलले तर अडचणी कमी होतील असं जोरदार प्रत्युत्तर दिल आहे. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

काय म्हणाले दरेकर?

प्रवीण दरेकर म्हणाले, केवळ केंद्र सरकारला टार्गेट करून आणि दुसऱ्या राज्यांतील स्वतःच्या सोयीची असलेली उदाहरणे देऊन राजकारण करण्याचा प्रयत्न मंत्री नवाब मलिक करतात. त्यामुळे ते जरा कमी बोलले तर अडचणी कमी होतील. तर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेबाबत नवाब मलिक यांनी उपाययोजना सुचवल्याचे कधी ऐकीवात नाही. उपलब्ध व्यवस्था गतिमान कशा होतील, यासंदर्भात सूचना केल्याचे त्यांच्या प्रेममध्ये सांगितल्याचे मला आठवत नाही. केंद्राला टार्गेट करत फक्त आपल्या सोयीची दुसऱ्या राज्यांची उदाहरणे देत राजकारण करण्याचा प्रयत्न मलिक करताना दिसत आहेत. असा जोरदार निशाणा प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्यावर साधला.

कोरोनाच्या संकटात परदेशातून आलेल्या मदतीवरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका केली जाते. एक गिव्ह अँड टेक पॉलिसी असते. आपण परदेशांना मदत केली नसती, तर आपल्याला मदत करण्याची भूमिका त्या देशांनी घेतली नसती. संकटाच्या काळात संकुचित विचार करणे योग्य नाही. व्यापकदृष्टिने विचार होण्याची गरज आहे. दुसऱ्या राज्यांची उदाहरणे देत असताना, त्या राज्यांनी कोरोनाच्या काय चांगल्या उपाययोजना, चांगल्या गोष्टी केल्या, त्या आपल्याकडे अमल करण्यासाठी राज्य सरकारने काय केले, याचे उत्तर नवाब मलिक देऊ शकत नाहीत, अशी टीका करत केंद्र आणि राज्य असा वाद आताच्या घडीला बंद होण्याची आवश्यकता आहे, असे प्रवीण दरेकर यांनी यावेळी सांगितले आहे.