धक्कादायक ! संशोधन : ‘या’ रक्त गटाच्या व्यक्तींना सर्वाधिक सावज बनवतोय ‘कोरोना’ व्हायरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संशोधकांनी सांगितले आहे की, आता तुमच्या रक्तगटावरून समजेल की तुम्हाला कोरोना विषाणूचा धोका आहे किंवा नाही. जर तुमचा रक्तगट ‘A’ असेल तर तुम्हाला कोरोना विषाणूपासून अधिक धोका आहे आणि तुमचा रक्तगट जर ‘O’ असेल तर तुम्हाला धोका कमी आहे. संशोधकांनी चीनच्या वुहान आणि शेंझेन मधील जवळपास २ हजार कोरोना विषाणूग्रस्तांच्या रक्तगटाचा अभ्यास करून हे संशोधन केले आहे.

यूएस नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इन्फॉरमेशन (US National Center for Biotechnology Information- NCBI) ने केलेल्या अभ्यासानुसार भारतात ‘O’ रक्तगटाचे जवळपास ३७.१२ टक्के, ‘B’ रक्तगटाचे ३२.२६ टक्के, ‘A’ रक्तगटाचे २२.८८ टक्के आणि AB रक्तगटाचे ७.७४ लोक आहेत.

नुकत्याच चीनमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण पहिले तर यामध्ये एकूण मृत्यूदर २.३ टक्के आहे. मात्र, यामध्ये ८० वर्षांपुढील वयस्कर लोकांमध्ये हा दर १५ टक्क्यांपर्यंत वाढतो. विशेष म्हणजे अनेक अहवालांनुसार हे स्पष्ट झाले आहे की, महिलांच्या तुलनेने पुरुषांमध्ये कोरोना विषाणूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वयस्कर पुरुषांमध्ये ज्यांचा रक्तगट A आहे अशांना या विषाणूपासून अधिक धोका आहे.

तसेच, ज्यांचा रक्तगट O आहे, त्यांना या विषाणूपासून धोका नाही असे म्हणता येणार नाही. त्यामुळे सर्व खबरदारी बाळगणे सगळ्यांना गरजेचे आहे. शासनाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करून योग्य ती काळजी सर्वांना घेणे गरजेचे आहे, जेणेकरून या प्राणघातक विषाणूपासून स्वतःचा बचाव करता येईल.