जावेद अख्तर यांच्याकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ‘कौतुक’, म्हणाले – ‘माझा त्यांना सलाम’

पोलीसनामा ऑनलाइन – राज्य सरकारकडून कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वारंवार फेसबुकवरुन संवाद साधत लोकांना संयम राखण्याचे आवाहन करीत आहेत. त्यांच्याकडून महत्त्वाचे निर्णय आणि सूचनांची माहिती दिली जात आहे. उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळत आहे त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. फक्त सर्वसामान्य नाही तर सेलिब्रेटीही जाहीरपणे ठाकरे यांंचे कौतुक करत आहेत. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनीही उद्धव ठाकरे कौतुकास पात्र असल्याचे सांगत त्यांना सलाम केला आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कौतूक केले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात महाराष्ट्र सरकार ज्या पद्धतीने कोरोना व्हायरसंबंधी स्पष्ट निर्देश देत परिस्थिती हाताळत आहे ते कौतुकास पात्र आहे. त्यांना माझा सलाम अशा शब्दात त्यांनी कौतुक केले आहे. जावेद अख्तर नेहमीच स्वतःच्या भावना परखड आणि स्पष्ट मांडत असतात. याआधी त्यांनी सर्व धार्मिक स्थळं बंद असताना काही मशिदींमध्ये नमाज पठण सुरु असल्यावरुन टीका केली होती. यावेळी त्यांनी मशिदी बंद करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत कोरोनाचे संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदने फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहीर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचे मी समर्थन करतो. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील का नाही, अशा आशयाचे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.