Hydroxychloroquine : संकटाच्या काळात PM मोदींनी प्रभु हनुमान यांच्या सारखी पोहचवली ‘संजीवनी’ बूटी, ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी केलं ‘कौतुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 एप्रिल रोजी आभार प्रदर्शन करणारे एक पत्र पाठवले आहे. या पत्रामध्ये बोल्सोनारे यांनी रामायणाचा उल्लेख केला आहे. भारताने हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन या औषधाच्या निर्यातीचा जो निर्णय घेतला आहे तो कौतुकास्पद असल्याचे बोल्सोनारो यांनी पत्रात म्हटले आहे. भारताच्या या निर्णयाची तुलना बोल्सोनारो यांनी रामायणातील हनुमानाने लक्ष्मणासाठी संजवीनी औषधी आणण्याचा प्रसंगाशी केली आहे.

भारताने कोरोनाविरुद्धच्या लढाईमध्ये महत्त्वपूर्ण समजली जाणारी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन आणि पॅरासीटेमॉल औषधांची निर्यात इतर देशामध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर ब्राझीलच्या पंतप्रधानांनी हे पत्र पाठवलं आहे.

पत्रात काय म्हटले ?
ज्याप्रमाणे भगवान हनुमान श्री रामाच्या भावाचे म्हणजेच लक्ष्मणाचे प्राण वाचवण्यासाठी हिमालयातून पवित्र औषधी घेऊन आले आणि बरं केलं. त्याचप्रमाणे भारत आणि ब्राझील या जागतिक संकटावर एकत्र काम करून मात करेल. लोकांच्या भल्यासाठी दोन्ही देश एकत्र काम करतील असं ब्राझीलच्या पंतप्रधानांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. या पत्रामध्ये ‘पवित्र औषध’ असा ज्याचा उल्लेख आहे त्याला रामायणामध्ये संजीवनी असं म्हटलं आहे. श्रीलंकेमध्ये झालेल्या युद्धामध्ये लक्ष्मण जखमी झाला तेव्हा भगवान रामाच्या सांगण्यानुसार भगवान हनुमानाने संजीवनी औषध हिमालयामधून आणल्याचा उल्लेख रामायणामध्ये आहे.

या औषधाला महत्व का ?
अमेरिकेआधी भारताकडे अशीच मागणी शेजारी असणाऱ्या श्रीलंका आणि नेपाळ सरकारनेही केली होती. एका वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, अमेरिकेमध्ये पुरवल्या जाणाऱ्या एकूण हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन औषधांपैकी अर्ध्याहून अधिक पुरवठा हा भारतीय कंपन्या करतात. मोदी आणि ट्रम्प यांच्या भाषणाआधीच काही आठवड्यांपूर्वी ट्रम्प यांनी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हायड्रोक्सी क्लोरोक्वाईन हे औषध गेम चेंजर ठरत असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र हे औषध कोरोनावर किती परिणामकारक आहे याबद्दल वैद्यकीय क्षेत्रामधील तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत.