Covid-19 : नव्या ट्रीटमेंटमुळं ‘कोरोना’च्या 79 % रूग्णांना फायदा, कंपनी म्हणाली – ‘मोठ यश’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूवर उपचार करण्याची एक नवीन पद्धत शोधली गेली आहे. एका वृत्तानुसार, ब्रिटनची औषधनिर्माण कंपनी Synairgen ने दावा केला आहे की, कोरोनाच्या ७९ टक्के रुग्णांना श्वासाद्वारे दिल्या जाणाऱ्या औषधाच्या वापरामुळे फायदा झाला आहे आणि त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले नाही. कंपनीने त्याला मोठे यश म्हटले आहे.

या औषधाचे नाव SNG001 आहे. ब्रिटनमध्ये रूग्णालयात दाखल असलेल्या १०१ कोरोना रूग्णांवर याची चाचणी केली गेली. या औषधात Interferon Beta नावाचे प्रथिने वापरले जाते. मानवी शरीर विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी हे प्रोटीन तयार करते.

उपचारादरम्यान हे औषध Nebuliser द्वारे थेट रुग्णाच्या फुफ्फुसांमध्ये दिले गेले, जेणेकरुन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होईल. चाचणीच्या परिणामावरून असे सूचित होते की हे औषध व्हायरसला कमकुवत करते.

नवीन उपचारांसह रूग्णालयात राहण्याच्या वेळेमध्येही घट झाली. औषधामुळे रूग्णालयात राहण्याची वेळ एक तृतीयांश कमी झाली. ९ दिवसांऐवजी ६ दिवसातच ते बरे झाले.

ब्रिटनमधील साऊथॅम्प्टनच्या Synairgen या औषध कंपनीने हे औषध तयार केले असून साऊथॅम्प्टन विद्यापीठाच्या संशोधकांनी या औषधाची चाचणी केली. अभ्यासादरम्यान असे दिसून आले की, ज्यांची स्थिती जास्त गंभीर असू शकत होती त्यापैकी ७९ टक्के रुग्णांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले नाही.

Synairgen चा दावा आहे की, नवीन औषधाच्या उपचारांनी रुग्णांच्या श्वासोच्छवासाच्या अडचणींमध्येही लक्षणीय सुधारणा झाली. ब्रिटनच्या ९ हॉस्पिटलमध्ये स्वयंसेवी झालेल्या एकूण १०१ रूग्णांवर याची चाचणी केली गेली होती.

मात्र या चाचणीचे निकाल अद्याप कोणत्याही जर्नलमध्ये प्रकाशित केले गेले नाहीत आणि पूर्ण डेटाही प्रकाशित केलेला नाही. पण शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, जर असेच परिणाम मोठ्या प्रमाणातील चाचणीत आढळले तर ते गेम चेंजर असेल. त्याचबरोबर कंपनीने म्हटले आहे की, येत्या काही दिवसांत ते जगातील आरोग्य संस्थांना आपला डेटा देणार आहेत.