Coronavirus : वरातीचा ‘थाट’ अन् ‘कोरोना’ पॉझिटिव्ह ‘जिजा’मुळं लागली 100 जणांची ‘वाट’, झाले क्वारंटाईन

भोपाळ : पोलिसनामा ऑनलाइन – सध्या कोरोना संसर्गामुळे जनजीवन ठप्प झालं आहे. अजून किती दिवस लॉकडाऊन राहणार हे निश्चित नसलं तरीदेखील यंदाच्या हंगामातील लाखो विवाह सोहळ्यांच्या मुहूर्तावर पाणी पडलं आहे. पण काही ठिकाणी अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत सामंजस्याने विवाह सोहळा पार पडतं आहे. तर काही ठिकाणी शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये विवाह सोहळे पार पडतं आहे. अशाच एका दिमाखात झालेल्या विवाह सोहळ्यात चक्क वधूचे भावोजीच कोरोना संसर्गित निघाले. त्यामुळे दोन्हीकडील कुटुंबातील १०० नातेवाइकांनाच क्वारंटाईन व्हावे लागण्याचा प्रकार समोर आला आहे.

मध्यप्रदेशातील छिंदवाडा येथे एक विवाह सोहळा पार पडला होता. त्यात वधू वरांना आशीर्वाद देण्यासाठी दोन्ही कुटूंबातील जवळपास १०० हुन अधिक नातेवाईक सहभागी झालेले. तसंच आपल्या मेव्हणीला आशीर्वाद देण्यासाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात कार्यरत असणारे तिचे भावोजीसुद्धा या विवाह सोहळ्यास आले होते. परंतु, विवाह सोहळा पार पडल्यानंतर दिल्लीहून आलेली एक व्यक्ती कोरोना संसर्गित असल्याचं समोर आलं.

ही व्यक्ती नववधूचे भावोजी असल्याचं कळालं. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं हालचाली करत नवदांपत्यासह दोन्ही कुटुंबातील १०० नातेवाईकांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना दिल्या. तसेच प्रशासनाने या सीआयएसएफ जवानाच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांची रवानगी क्वारंटाईन सेंटरमध्ये केली असून, जिल्ह्यातील दोन ठिकाणांना कंटेनमेंट क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे.

या सीआयएसएफच्या जवानाने २०-२१ मे च्या काळात जिल्ह्यात प्रवेश केला होता. त्याची हेल्थ स्क्रीनिंग छिंदवाडा-होशंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवरती करण्यात आली होती. परत तो छिंदवाडा येथील जुन्नारदेवमधील लालबाग आणि एकता कॉलनीमधील काही लोकांना भेटल्याची माहिती कळतं आहे. तसंच या जवानाची अधिक माहिती मिळवली जात असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.