Coronavirus : रुग्णालयाच्या ‘क्वारंटाईन’मध्ये दाखल केल्यानंतर तासाभरात रुग्णाचा मृत्यू

बुलढाणा : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोरोना संशयितांना रुग्णालयात आणि घरामध्ये क्वारंटाईन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णाचा तासाभरात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या रुग्णाला रुग्णालयात आज सकाळी ठेवण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरु असताना या रुग्णाचा मृत्यू झाला. या वृत्ताला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दुजोरा दिला आहे.

मृत पावलेल्या व्यक्तीला निमोनिया झाला होता. तो अधिक वाढल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात क्वारंटाईन कक्षात दाखल करण्यात आले होते. या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला होता की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या मृत व्यक्तीचे स्वॅब नुमने हार्ड अ‍ॅण्ड फास्ट तत्वावर नागपूर येथे पाठवण्यात आले आहेत. हे नमुने आल्यानंतर या व्यक्तीचा मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

मृत व्यक्तीचे नमुने सायंकाळी सातच्या सुमारास नागपूर येथील लॅबमध्ये पोहचतील. त्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. मृत व्यक्ती ही बुलढाणा शहरातीलच असून ती वयोवृद्ध नव्हती. बुलढाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये मागील दोन दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याचा निमोनिया अधिकच वाढत गेला. त्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती. दुसरीकडे बुलडाणा जिल्ह्यात आलेल्या 92 परदेशी नागरिकांची तपासणी करण्यात आली असून यापूर्वी नागपूर येथे पाठवण्यात आलेल्या 11 जणांचे स्वॅब नमुने निगेटीव्ह आले आहेत.