Coronavirus Impact : ‘कोरोना’च्या संसर्गामुळं जीवनभर इतर आजार होण्याची भीती !

लंडन :  वृत्तसंस्था –   कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. कोरोना विषाणूची वेळोवेळी नवीन लक्षणं आढळून येत आहेत. फुफ्फुस आणि हृदयविकाराच्या त्रासामुळे ब्रेन डेमेज, पक्षघातासारखी लक्षणे कोरोनाबाधितांमध्ये आढळत आहेत. कोरोनाच्या संसर्गावर जगभरातील शास्त्रज्ञ औषध शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर दुसरीकडे आयुष्यभरासाठी आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जगभरात कोरोना बाधित अनेक रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. मात्र, या रुग्णांमध्येही इतर आजार होण्याची भीती डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ब्रिटनमधील डॉक्टरांच्या मते कोरोना संसर्गाची लक्षणं ही 30 दिवस अथवा त्याहून अधिक दिवसांमध्ये आढळून येतात. तर जागतिक आरोग्य संघटनेनुसार कोरनाची लक्षणं आढळण्यास 14 दिवसांचा अवधी पुरेसा आहे.

एका अहवालानुसार, काही रुग्णांना कोरोनाचा व्हायरस अधिक काळापर्यंत त्रासदायक ठरू शकतो. लंडनमधील एका महिलेला खोकला आणि तापाची लक्षणे आढळली होती. यानंतर डॉक्टरांनी या महिलेवर उपचार सुरु केले. त्यानंतर नऊ आठवड्यांनी या महिला रुग्णांमध्ये हृदयविकाराचा आजार दिसू लागला. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावर उपचार करणारे डॉ. निकोलस यांनी देखील हृदविकाराचा इशारा दिला होता.

तसेच कोरोनाचा विषाणू हा येणाऱ्या पिढ्यांसाठी पोलिओसारखा आजार ठरण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. येणाऱ्या काही वर्षात कोरोनाचा प्रभाव दिसू शकतो. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गावर मात केल्यानंतरही इतर आजारांचाही धोका असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्ये 31 हजार 855 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर जगभरात 2 लाख 80 हजारापेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.