Coronavirus : … तर तिसर्‍या टप्प्यात जाण्यापासून आपण महाराष्ट्राला वाचवू शकतो : अजित पवार

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन –  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवाहन करत म्हटले कि, ‘राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ वैयक्तिक संपर्कातून झाली आहे. योग्य काळजी घेतली तर कोरोनाला तिसऱ्या टप्प्यात जाण्यापासून आपण राज्याला वाचवू शकतो. त्यासाठी राज्यातील लोकांनी घराबाहेर न पडण्याचा निश्चय करावा.’ तसेच ते म्हणाले की, राज्यात आज ७ नवे रुग्ण आढळले असून एकूण १९३ संख्या झाली आहे. जनतेने घरातच थांबून योग्य काळजी घेत खरेदीची गर्दी टाळली तर, आयजोलेशन केलेल्या रुग्णांनी सूचनांचे पालन केले तर आपण निश्चितपणे कोरोनाला रोखू शकतो.

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमधील एकाच कुटुंबातील २४ जणांना कोरोनाची लागण झाली असून अमरावती जिल्ह्यातील व्यापाऱ्यासह कुटुंबातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यापाऱ्याने आजारी असताना मेरठपर्यंत रेल्वेने प्रवास केल्याचे समोर आल्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे. इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्याच्या बेजबाबदारपणाला खपवून घेतले जाणार नाही. कोरोनाबाबत बेजबाबदारपणे वागणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील, असेही ते म्हणाले. तसेच प्रत्येकाने किमान दोन आठवडे घराबाहेर न पडण्याचा संकल्प करूया, असा सल्ला त्यांनी दिला.

पुढे ते म्हणाले की, शहरात आजही खरेदीसाठी गर्दी होत असून कोरोनाचा धोका वाढत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या मर्यादित ठेवायची असेल तर प्रत्येकाने लॉकडाऊनचे पालन करावे. बाहेरील राज्यातील मजुरांनी आपापल्या राज्यात जाण्याचा प्रयत्न करून जीव धोक्यात घालू नये. त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था संबंधित जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येईल. तसेच मोदींच्या ‘मन की बात’ मधून केलेल्या आवाहनांचे पालन करावे. राज्य आणि केंद्र सरकार आणि देशातील जनता सर्वजण मिळून कोरोनाची लढाई जिंकू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.