सावधान ! श्वासोच्छवासाद्वारे आणि संवादाद्वारे देखील पसरू शकतो ‘कोरोना’ व्हायरस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना विषाणूमुळे जगभरात एक भितीदायक वातावरण निर्माण झाले आहे. आतापर्यंत 59 हजाराहून अधिक लोक यामुळे मरण पावले आहेत. कोरोना विषाणूवर आतापर्यंत डॉक्टरांना लस तयार करण्यात यश आले नाही. दरम्यान, कोरोना विषाणूच्या प्रसाराबद्दल शास्त्रज्ञांकडून सतत चेतावणी देण्यात येत आहेत. अमेरिकेच्या सायंटिस्ट पॅनेलचे असे म्हणणे आहे की, श्वासोच्छवासाद्वारे आणि संवादातून कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो.

हवेमध्ये पसरतो विषाणू
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हा वायुजन्य आजार आहे आणि तो वेगाने पसरत आहे. अहवालात असे म्हटले आहे की, संक्रमित रूग्ण श्वास घेताना हे विषाणू हवेत येतात. एक विषाणूशास्त्रज्ञ म्हणाले, ‘याच कारणामुळे हा विषाणू वेगाने पसरत आहे. लोकांना याची लक्षणे पटकन दिसत नाहीत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन आणि आयसोलेशन हे विषाणूपासून बचाव करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

यूनाइटेड स्टेट सेंटर्स फोर डिडिज कंट्रोल अ‍ॅण्ड प्रिवेनशननुसार, हा विषाणू 6 फूटांपर्यंत पसरू शकतो, जर एखाद्या संक्रमित रुग्णाला शिंका येत असेल किंवा खोकला असेल त्यांच्या थेंबामार्फक विषाणू हवेत पसरतो आणि 6 फूट अंतरापर्यंत धोकादायक ठरू शकतो. सीएनएनच्या मते, फिनबर्ग नावाच्या वैज्ञानिकांनी व्हाईट हाऊसला एक पत्र लिहिले आहे, ज्यात ते म्हणाले की, चीनमध्ये केलेल्या संशोधनातून असे दिसून आले आहे की, डॉक्टर आणि परिचारिकांचे संरक्षणात्मक गियर खोलण्याच्या दरम्यान विषाणू हवेत पसरतात.

विषाणू बराच काळ हवेमध्ये राहतो
यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अ‍ॅण्ड इन्फेक्टीव्ह डिजीज (एनआयएआयडी) च्या संशोधनात असे दिसून आले आहे की, हा विषाणू बराच काळ हवेमध्ये कार्यरत राहू शकतो. जेव्हा एक निरोगी व्यक्ती या हवेमध्ये श्वास घेते तेव्हा त्या व्यक्तीला देखील विषाणूचा संसर्ग होऊ शकतो.