Coronavirus : ‘आपण बँक कर्मचार्‍यांच्या जीवनाशी खेळतोय का ?’ भाजपाचा सवाल

पोलिसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोनाने थैमान घातले असून केंद्र सरकारकडून पुढील 21 दिवस देश पूर्णपणे लॉकडाउन राहिल अशी घोषणा केली आहे. परंतु त्यातून बँकींकसह काही महत्वाच्या सेवा पुरवणार्‍या क्षेत्रांना वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे बँक कर्मचार्‍यांना लॉकडाउनमध्येही कामावर जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा आणि गैरसोयीचा विचार करताना महाराष्ट्र भाजपाने बँका आणि शेअर बाजारही काही दिवस बंद ठेवावा अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटवरुन देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांना टॅग करत बँका सुरु ठेवण्याबद्दल फेरविचार करावा असे मत व्यक्त केले आहे. आपण सगळे शेअर बाजार आणि बँका काही दिवस बंद ठेऊ शकतो का ? हे जरा कठीण वाटते असले तरी महत्वाचे आणि करता येण्यासारखे आहे असे ट्विट वाघ यांनी केले आहे. अगदी बंद नाही ठेवता आले तरी दिवसाआड काम करण्याची मुभा या संस्थांना देता येईल का ? आपल्याला रोज कशासाठी बँकेत जावे लागते ? आपण बँकेत काम करणार्‍यांशी आयुष्याशी खेळतोय का ?, असे प्रश्न वाघ यांनी आपल्या ट्विटमधून उपस्थित केले आहेत. या ट्विटमध्ये त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनाही टॅग केले आहे.

ग्राहकांनी जास्तीत जास्त डिजिटल ट्रान्झॅक्शनचा वापर करावा, असे आवाहन बँकांकडून करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त खबरदारीचा उपाय म्हणून या बँकांनी कामावर येणार्‍या कर्मचार्‍यांची संख्याही कमी केली आहे. अनेक लहान मोठ्या बँकांनी आपल्या स्तरावर काही महत्वपूर्ण निर्णय घेतले असले तरी बँका सुरु असल्याने कर्मचारी वर्गाला त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार बँकेतील कर्मचारींनी केली आहे. यासंदर्भात एचडीएफसी बँकेने कामकाजाची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत ही बँक कार्यरत राहणार आहे. परदेशी चलन बदलणे आणि पासबुक अपडेटसारख्या सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या आहेत.