Dr. Tatyarao Lahane : कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील सांगता येणार नाही, पण…

पोलीसनामा ऑनलाइन : देशात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. दुसरीकडे मृतांचा आकडादेखील वाढला आहे. अशातच टास्क फोर्सच्या सदस्यांनी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविल्याने खळबळ उडाली आहे. वैद्यकीय शिक्षण संचालनलयाचे संचालक तात्याराव लहाने यांनी यावर भाष्य केले आहे. साथीच्या रोगामध्ये व्हायरसची ताकद सतत वाढत असते. व्हायरस आपल्यात बदल करत असतो. यामुळे कोरोनाच्या आणखी किती लाटा येतील हे सांगता येत नाही. कितीही लाटा आल्या तरीही महाराष्ट्र खंबीर आहे. पुरेशी तयारी आहे. कोरोनाविरोधात लढण्यासाठी आपण तयारी केल्याचे लहान म्हणाले.

राज्यात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यान राज्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 7 लाखांवर पोहचली आहे. त्यामुळे सरकारने ऑक्सिजन, बेड आणि व्हेंटिलेटरची योग्य व्यवस्था केली आहे. कोरोना रुग्णांचे आकडे लपवायचे नाहीत, असे आम्हाला आदेश आहेत. एखाद्याचा अपघाती मृत्यू झाला आणि तो कोरोनाबाधित असेल तर त्याचा मृत्यू कोरोनाबाधित म्हणूनच दाखविला जातो. कोणतीही लपवाछपवी केली जात नसल्याचे लहाने यांनी स्पष्ट केले आहे.